esakal | सर्पदंश झालेल्या शेतकऱ्याला मिळाले जीवदान, उमरग्यातील सुखद घटना
sakal

बोलून बातमी शोधा

सर्पदंश झालेल्या शेतकऱ्याला मिळाले जीवदान, उमरग्यातील सुखद घटना

सर्पदंश झालेल्या शेतकऱ्याला मिळाले जीवदान, उमरग्यातील सुखद घटना

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा(जि.उस्मानाबाद) : कोरोना संसर्गाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे उपचारासाठी हतबल होणाऱ्या आरोग्य यंत्रणेसमोर अनेक समस्या उभ्या आहेत. कोविडशिवाय इतर गंभीर आजाराच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी अनेक अडचणी येत असताना येथील डॉ.विजय बेडदुर्गे यांनी सर्पदंश झालेल्या औराद (ता.उमरगा) येथील एका शेतकऱ्याला योग्य उपचार पद्धतीने जीवदान दिले आहे.

उमरगा शहरातील उपजिल्हा रुग्णालयात नॉन कोविडची सुविधा बंद झाल्याने सामान्य कुटुंबातील रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागत आहे. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखीने त्रस्त असलेल्या नागरिकांना खासगी रुग्णालयात धावपळ करावी लागत आहे. औराद येथील शेतकरी योगेश जाधव (वय ४५) यांना नऊ एप्रिलला शेतात काम करताना मन्यार जातीच्या विषारी सापाने हाताच्या बोटाला चावा घेतला. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी शिवाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉ.बेडदुर्गे कोविड रुग्णांच्या तपासणीत व्यस्त असताना त्यांनी श्री.जाधव यांना दाखल करून घेतली आणि तातडीने उपचार सुरु केले.

बेशुद्ध अवस्थेत असलेल्या श्री. जाधव यांना व्हेंटिलेटरवर चार दिवस ठेवण्यात आले. चौथ्या दिवशी त्याची डोळ्याची झापड उघडली. दरम्यान विषबाधेच्या रुग्णाचा उपचारासाठी लागणाऱ्या औषधांचा खर्च अवाढव्य असतो. त्यामुळे डॉ. बेडदुर्गे यांनी महात्मा फुले जनआरोग्य योजनेतुन लाभार्थ्यांना मिळणाऱ्या ४५ हजारांच्या खर्च योजनेत श्री. जाधव यांच्यावर उपचार केले. सामाजिक बांधिलकी म्हणुन आगाऊ खर्चाचा बोजा त्या शेतकऱ्याला बसू दिला नाही. कठीण परिस्थितीत कोविड रुग्णांसाठी बेड, ऑक्सिजनची सुविधा अपुरी पडत असतानाही श्री. जाधव यांना डॉ. बेडदुर्गे यांनी आपल्या हातगुणाने आणि रुग्ण व नातेवाईकावर आर्थिक बोजा न देता ठणठणीत केले आहे. नॉन कोविड सुविधाही कठीण परिस्थितीत उपलब्ध करून देता येता. त्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन असावा लागतो हे डॉ. बेडदुर्गे यांच्या कार्य कौशल्यातुन दिसून येते.

loading image