esakal | ज्वारीच्या कोठारात ‘भाकरी’ शोधण्याची वेळ

बोलून बातमी शोधा

ज्वारीच्या कोठारात ‘भाकरी’ शोधण्याची वेळ
ज्वारीच्या कोठारात ‘भाकरी’ शोधण्याची वेळ
sakal_logo
By
टीम ई सकाळ

परंडा (जि.उस्मानाबाद) : ज्वारीचे कोठार अशी परंडा तालुक्याची राज्यभर ओळख आहे. सिंचनाच्या सोयी झाल्याने ज्वारीचे उत्पन्न घेण्याचा शेतकऱ्याचा कल कमी झाला आहे. त्याऐवजी ऊस आणि फळपिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे ज्वारीच्या कोठारात ‘भाकरी’ शोधण्याची वेळ आली आहे. कायम दुष्काळी असलेल्या या भागात मोठ्या प्रमाणात ज्वारीचे उत्पन्न घेतले जात होते. तालुक्यातील सिरसाव, जवळा (नि.) माणकेश्वर, वाकडी परिसरात ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नगर या भागात येथील ज्वारीला मोठी मागणी असते.

श्री क्षेत्र सोनारी येथे श्री काळभैरवनाथाच्या दर्शनासाठी येणारे अनेक भाविक आवर्जून येथून ज्वारी घेऊन जातात. ऐकेकाळी तालुका परिसरात हजारो क्विंटल ज्वारीचे उत्पादन या भागात होत होते. दुष्काळात तब्बल एक लाख पोते ज्वारी जमा केल्याचे अनेक जण सांगतात. मागील काही वर्षांपासून तालुक्यात मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या सोयी झाल्याने अनेकांची शेती बागायत झाली. परिसरात सीना-कोळेगाव, पांढरेवाडी, साकत, खासापुरी, चांदणी असे सिंचन प्रकल्प उभारण्यात आले तर जवळच असलेल्या सीना नदीमध्ये उजनीचे पाणी बोगद्यातून आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या सोयी झाल्या.

परिसरात साखर कारखाने उभारले गेल्याने अनेकांनी एकरकमी उत्पन्न देणाऱ्या उसाच्या लागवडीला महत्त्व दिले. अनेकांनी फळबागा उभारल्या पपई, द्राक्ष, सीताफळ यांची लागवड तालुक्यात मोठ्या प्रमाणात झाल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे ज्वारीचे क्षेत्र कमालीचे कमी झाले. त्यामुळे उत्पन्न कमी झाले. त्यामुळे येथील बाजारपेठेतही ज्वारीची फारशी आवक नाही. हजारो क्विंटल ज्वारीचे उत्पन्न घेणाऱ्या या भागातील बाजारपेठेत चाळीस ते पन्नास क्विंटल ज्वारीची आवक होत आहे. दोन हजार ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलला भाव मिळत आहे. बागायतदार झालेल्या शेतकऱ्यांवर भाकरीचा शोध घेण्याची वेळ आली आहे.