esakal | तुळजापुरात लॉकडाउनने बाजारपेठ ठप्प, अनेकांपुढे आर्थिक संकट

बोलून बातमी शोधा

null

तुळजापुरात लॉकडाउनने बाजारपेठ ठप्प, अनेकांपुढे आर्थिक संकट

sakal_logo
By
जगदीश कुलकर्णी

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : येथे रोज हजारो भाविक तुळजाभवानी मातेच्या दर्शनसाठी येतात. त्यामुळे अनेकांना रोजगार मिळाला होता. शहराचे मुख्य आर्थिक स्त्रोत भाविकच आहेत. पण, लॉकडाउनमुळे भाविकांसाठी मंदिर बंद आहे. त्यामुळे अनेकांचा रोजगारही बंद असून, ते आर्थिक अडचणीत आले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे प्रशासनाने तुळजाभवानी मंदिर पुन्हा भाविकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला. शहरात भाविक येणे पूर्णतः बंद झालेले आहे.

त्यामुळे शहरातील प्रासादिक दुकाने, ऑटोरिक्षा, कापड व्यापारी, लॉज, चहा व्यावसायिक, फूल हार विक्री करणारे, हॉटेल यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. ता. २७ एप्रिलला तुळजाभवानी मातेची चैत्री यात्रा आहे. ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन आहे. त्यामुळे चैत्री यात्राही होणार नाही. शहरातील कापड दुकानदारांचा व्यवसाय हा साड्या विक्रीवर अवलंबून आहे. अनेकजण येथे साड्या घेऊन त्या देवीला अर्पण करतात. शहरातील प्रासादिक वाणाच्या दुकानांसाठी साखर फुटाणे बत्तासे यांचे कारखाने पुन्हा संचारबंदीमुळे बंद झाले आहेत. या सगळ्याचा शहरातील बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे व्यवसायासाठी घेतलेले कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. अनेकांनी कर्ज काढून घेतलेली रिक्षा आला दारासमोर उभी आहे.

एक वर्षात तीन यात्रा रद्द : मागील वर्षी २०२० मध्ये लॉकडाउन जाहीर झाल्याने तुळजाभवानी मातेची चैत्री यात्रा होऊ शकली नाही. ऑक्टोबर २०२० मध्ये अश्विनी यात्राही कोरोनाच्या सावटामुळे झाल्या नाहीत. आता २७ एप्रिलला तुळजा भवानी मातेची चैत्री यात्रा आहे. परंतु, राज्य सरकारच्या आदेशाप्रमाणे ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे चैत्री यात्रा होऊ शकणार नाही. व्यापाऱ्यांना त्याचा मोठा फटका बसणार आहे.

वर्षभरापासून आम्हाला कामच नाही. त्यामुळे आवकही बंद आहे. आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. शासनाने आर्थिक मदत करावी.

- चंद्रकांत बडोदकर, बॅण्ड व्यावसायिक, तुळजापूर.