esakal | अडचणी संपत संपेना! कळंबमध्ये कोरोनामुळे मृत झालेल्या रुग्णावर वेळेवर होईना अंत्यसंस्कार
sakal

बोलून बातमी शोधा

अडचणी संपत संपेना! कळंबमध्ये मृत रुग्णावर वेळेवर होईना अंत्यसंस्कार

अडचणी संपत संपेना! कळंबमध्ये मृत रुग्णावर वेळेवर होईना अंत्यसंस्कार

sakal_logo
By
दिलीप गंभीरे

कळंब (जि.उस्मानाबाद) : कळंब शहरातील एका परिवाराच्या भावनांशी नगरपालिका प्रशासनाने तीन तास खेळ केला. शिक्षक कॉलनी भागातील एका परिवारातील एक व्यक्ती कोरोनामुळे मृत्युमुखी पडल्यानंतर कल्पना देऊनही पालिकेचे कर्मचारी वेळेवर न आल्याने अंत्यसंस्कार तीन तास झाले नाही, असा आरोप शहरातील काही व्यक्तींनी केला आहे. दरम्यान पालिकेचे स्वच्छता निरीक्षक संजय हाजगुडे यांनी सांगितले की, घटना दुपारी घडली असावी. अंत्यविधीसाठी सात वाजेच्या सुमारास फोन आला. त्यानंतर अंत्यसंस्कारासाठी हालचाली सुरू केल्या. शहरातील शिक्षक कॉलनी भागातील एका व्यक्तीचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाल्याची घटना शनिवार (ता.१८) घडली.

कोरोना संसर्गाने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीवर पीपीई किट, सॅनिटायझर आदी उपलब्ध करून पालिकेच्या नियुक्त कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार केले जातात. दरम्यान पालिकेच्या संबधित प्रशासनाला कळवूनही अंत्यविधीसाठी हजर झाले नाहीत. त्यामुळे मृत्युदेहलाच तब्बल तीन तास पालिकेच्या कर्मचाऱ्याची वाट बघावी लागली. अंत्यविधीसाठी उपस्थित नातेवाईकांनी वारंवार पालिकेच्या प्रशासनाला फोन करूनही वेळेत हजर झाले नाहीत आणि त्याच वेळी आमदार कैलास घाडगे-पाटील कळंब उपजिल्हा रुग्णालयात आले असता नातेवाईकांनी पालिका प्रशासनाचा दुर्लक्षितपणा निदर्शनास आणून देण्यात आला. आमदार पाटील यांनी कळंब नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना फोन लावला व त्यानंतर कर्मचारी आले. त्यानंतरही दिरंगाई होऊ लागल्यानंतर श्री.पाटील यांनी सांगितले की ,जोपर्यंत तुम्ही हा मृतदेह अंतिम संस्कारासाठी घेऊन जाणार नाहीत, तोपर्यंत मी इथून जाणार नाही. त्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी जवळपास साडेतीन ते चार तासांनी स्मशानभूमीत नेण्यात आला. या घटनेचे पडसाद सोशल मीडियावर उमटू लागले असून पालिकेच्या दुर्लक्षित कारभाराचा निषेध केला जात आहे.

आम्हाला उशिरा कळाले : सायंकाळी सात वाजेच्या सुमारास कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी आम्हाला नातेवाईकांचा फोन आला. त्यानंतर पालिकेच्या कर्मचाऱ्याकडून पुढील कारवाहीसाठी हालचाली केल्या. शुक्रवारी कृष्णा हॉस्पिटलमधील एक कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यांच्यावर रात्री दीड वाजता अंत्यसंस्कार केले. असे पालिकेचे स्वच्छता निरीक्षक संजय हाजगुडे यांनी सांगितले.

प्रशासनावर वचक नाही : नगरपरिषद सत्ताधारी मंडळींचे प्रशासनावर वचक राहिला नाही. त्यामुळे मृत्यूनंतरही अंत्यविधीसाठी हेळसांड होत आहे. यापुढे जर असा प्रकार घडला तर शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेचे सोशल मीडियाचे तालुकाध्यक्ष उदयचंद्र खंडागळे यांनी दिला आहे.