esakal | उमरग्यात गारांचा पाऊस, वादळी वाऱ्याने शेत-शिवारात नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

उमरगा(जि.उस्मानाबाद) : शिवारात दोन एकर क्षेत्रातील कलिंगडचे नुकसान झाले आहे.

उमरग्यात गारांचा पाऊस, वादळी वाऱ्याने शेत-शिवारात नुकसान

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा(जि.उस्मानाबाद)  : शहरासह (Umarga) तालुक्यातील अनेक गावांत शनिवारी (ता.आठ) सायंकाळी सहाच्या सुमारास विजेचा गडगडाटासह वादळी वारा व गारांच्या पावसामुळे (Hailstorm) काढणीला आलेले कलिंगड (WaterMelon), काकडी, भाजीपाला (Vegetables), आंबा फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान (Osmanabad) उमरगा, जकेकूर, गुंजोटी, तुरोरी, एकोंडी (जहागीर) आदी गाव शिवारातील पत्र्यांचे शेड अक्षरश: उडून गेले. अनेक घरावरील पत्रेही उडाले. नागरिकांना त्याची जमवाजमव करण्यासाठी रविवारचा (ता.नऊ) दिवस गेला.  शनिवारी सायंकाळी शहरासह  मेघगर्जनेसह गारांचा सडा होत होता. त्यात वादळी वाऱ्याचा वेग भयानक असल्याने शेत शिवारातील राहण्याचे शेड, जनावरांच्या गोठ्यावरील पत्रे उडून गेले. वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली. विशेषत: कैऱ्या लगडलेल्या आंब्याची झाडे आणि फांदे कोसळून पडले. शिवारातील ज्वारीच्या (Jawar) गंजीतील पेंड्या वाऱ्याच्या वेगासह हवेत फिरत होत्या. दरम्यान डॉ. डी.एस. थिटे यांच्या शेतातील पत्र्यांचे शेड कोलमडून पडले. आंबे, नारळाची झाडेही कोसळली. पोपटराव सोनकांबळे यांच्या शेतातील कडब्याची गंजीतील पेंड्या हवेत विखुरल्या गेल्या. (Osmanabad Rain Updates Hailstorm Hit Crops In Umarga)

हेही वाचा: बीड जिल्ह्यात अवकाळीचा दुसऱ्या दिवशीही तडाखा; नद्यांना पाणी, पिकांचे नुकसान

कलिंगडचे मोठे नुकसान

उमरगा शिवारातील शिवाजी कोराळे यांनी दोन एकरात चाळीस ते पन्नास हजार खर्चुन कलिंगडची लागवड केली होती. आठ दिवसांत कलिंगडची तोडणी करण्यात येणार होती. मात्र वादळी वारा व गारांच्या पावसाने झोडपल्याने कलिंगडसह वेलाची वाट लागली. साधारणत : दोन ते सहा किलो वजनाचे कलिंगड तयार झाले आहे. मात्र त्यावर गारांचा जबर मारा झाल्याने तोडणी अगोदरच ते खराब होत आहे. श्री.कोराळे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील कलिंगडचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा: जालन्यात भरदिवसा पिस्तुलीचा धाक दाखवून व्यापाऱ्याला लुटले, दरोडेखोर पसार

दुसऱ्या दिवशीही 'अवकाळी'चे आगमन

शनिवारी सांयकाळी अवकाळी पावसाचे आगमन झाल्यानंतर वाऱ्याने अनेक झाडे तुटली. रविवारी सांयकाळी पुन्हा ढगाळ वातावरणात तयार झाले आणि विजेच्या गडगडासह पावसाला सुरूवात झाली. ढगाळ वातावरणामुळे रात्री उशीरापर्यंत वाऱ्यासह पावसाची रिमझिम सुरू होती.

मोठी मेहनत आणि आर्थिक जुळवाजुळव करून दोन एकर क्षेत्रात कलिंगडची लागवड केली होती. चार दिवसांनंतर उत्पन्न नजरेत दिसत होते. मात्र अर्धा तासाच्या गारांच्या पावसाने केलेली मेहनत वाया घातली. शिवाय आर्थिक फटकाही बसला. दोन एकरात साधारणतः सव्वा लाखांचे उत्पन्न अपेक्षित होते. आता वेल तुटुन गेले आहेत. गाराचा दणक्याने कलिंगडचेही नुकसान झाले आहे. प्रशासनाने नुकसानीची पाहणी करुन मदत करावी.

- शिवाजी कोराळे, शेतकरी, उमरगा