Crime News : गुटख्याचा हफ्ता ‘फोन पे’वरून घेणे पोलिस कर्मचाऱ्याला पडले महागात pachod illegal gutkha selling installment police employee suspend crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sachin Bhume

Crime News : गुटख्याचा हफ्ता ‘फोन पे’वरून घेणे पोलिस कर्मचाऱ्याला पडले महागात

पाचोड - गुटख्याचा हफ्ता म्हणून पाचोड (ता.पैठण) येथील अनधिकृत गुटखा विक्रेत्याकडून ‘फोन पे’वरून पंचवीस हजार रुपये स्वीकारणाऱ्या सचिन दशरथ भुमे या पोलिस कर्मचाऱ्याला छत्रपती संभाजीनगर (ग्रामीण) चे पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया या यांनी बुधवारी (ता.७) तडकाफडकी निलंबित केले.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, पैठण येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या पथकात असलेल्या सचिन भुमे या कर्मचाऱ्याने बुधवारी (ता.७) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पाचोड येथील एका अनधिकृत गुटखा विक्रेत्यास पाचोड-पैठण रस्त्यावर दावरवाडी (ता.पैठण) फाट्याजवळ गुटखा नेत असताना पकडले व आर्थिक तडजोड करून २५,०००/- रुपये घेऊन त्यास सोडून दिले आहे.

वास्तविक पाहता एक जबाबदार पोलिस अंमलदार असून त्यास कायद्याचे परिपूर्ण ज्ञान असतानाही भुमे याने सदर इसमास ताब्यात घेऊन नियमानुसार कायदेशीर कारवाई करणे अपेक्षीत असताना व केलेल्या कारवाईबाबत वरिष्ठांना माहिती देणे गरजेचे होते. तसे न करता सदर इसमाकडून तडजोड व आर्थिक व्यवहार करून सदर इसमास परस्पर पंचवीस हजार रुपयांत तडजोड करून ''फोन पे'' वरून सदर रक्कम स्वीकारून ''त्या'' गुटखा विक्रेत्यास कारवाई न करता सोडून दिले.

यावेळी काही जणांनी व्हिडिओ तयार करून पोलिस अधिक्षकास पाठविला. या घटनेची जिल्हा पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांना माहिती मिळताच त्यांनी तडकाफडकी सचिन भुमे यांचे निलंबन करून तसे आदेश जारी केले.

मिळालेल्या माहितीनुसार, भुमे हा एका पोलिस अधिकाऱ्याचा लाडका व विश्वासू कर्मचारी होता. तो तालुक्यातील सर्व पोलिस ठाणे हद्दीतील अवैध धंदेवाल्यांच्या संपर्कात असायचा. तसेच आपण डीवायएसपी पथकात असून कारवाईची भीती दाखवत हा पोलिस कर्मचारी अनेकांकडून पैसे वसूल करत होता. त्यासंबंधी पोलिस अधिक्षकांकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

त्यामुळे पोलिस अधीक्षकांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना त्यांनी एका पोलिस अधिकाऱ्याला दिल्या होत्या. पोलिस अधीक्षकांनी भुमे याच्यावर पोलिस खात्याची प्रतिमा मलीन केली असल्याचा ठपका ठेवून निलंबनाची कारवाई केली.

या कालावधीत खासगी नोकरी, व्यापार किंवा व्यवसाय करता येणार नाही. निलंबन कालावधीत जर नोकरी, व्यापार किंवा व्यवसाय केल्याचे दिसून आले तर ते गैरवर्तन समजण्यात येऊन निलंबन भत्त्यात मुकावे लागेल असे आदेशात म्हटले आहे. एकंदरीत या कार्यवाहीमुळे ग्रामीण पोलिस दलात खळबळ उडाली आहे.