
पाचोड : चाकूहल्ला करून दोन तरुणांना चौघांनी लुटले
पाचोड : गावाबाहेर शौचास गेलेल्या दोन तरुणांवर अज्ञात चार जणांनी चाकू हल्ला करून लुटल्याची घटना दावरवाडी (ता.पैठण) शिवारात मंगळवारी (ता.२२) रात्री घडली असून चोरट्यांनी दोन मोबाईलसह हातातील घड्याळ घेऊन पोबारा केला. याप्रकरणी पाचोड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले की, पैठण-पाचोड राज्य महामार्गावरील दावरवाडी शिवारात मंगळवारी (ता.२२) रात्री दावरवाडीतील प्रकाश औटे, प्रीतमकुमार एडके हे दोघे शौचास गेले होते. ते पुन्हा गावाकडे येत असताना त्यांच्यावर चार जणांनी अचानक हल्ला करून प्रकाश औटे याच्या पाठीच्या उजव्या बाजूला चाकू भोसकून गंभीर जखमी केले. तर प्रीतमकुमार यास जबर मारहाण करून त्यांच्याकडील चाळीस हजाराचे दोन मोबाईल व दोघांच्या हातातील घड्याळ घेऊन चोरट्यांनी पोबारा केला.
यावेळी प्रकाश व प्रीतमकुमार यांचा आवाज ऐकून आजूबाजूला असलेल्या ग्रामस्थांनी त्यांच्याकडे धाव घेतली. तोपर्यंत चोरटे पळत होते. काही तरुणांनी त्यांचा पाठलाग केला. परंतु ते चार चोरटे एका दुचाकीवर बसून पळून गेले. जखमी दोघांना पाचोड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
माहिती मिळताच पाचोड पोलिस ठाणेचे सपोनि. गणेश सुरवसे, फौजदार सुरेश माळी, जमादार प्रशांत नांदवे, पवन चव्हाण, शिंदे यांनी रुग्णालयात धाव घेऊन पंचनामा केला.
पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली असता बुधवारी (ता. २३) पहाटे साष्टपिंपळगाव (ता.अंबड) परिसरात मोबाईलचे लोकेशन दिसून आले. यामुळे पाचोड पोलिसांनी पाठलाग केला. मात्र, पोलिस आल्याचे कळताच चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत दुचाकी सोडून पसार झाले. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुरेश माळी, जमादार प्रशांत नांदवे, पवन चव्हाण हे करीत आहे.
Web Title: Pachod Two Youths Were Robbery Four Men With Knife
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..