सत्ताधारी, विरोधकांत रंगणार काट्याची टक्कर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Paithan market committee election

सत्ताधारी, विरोधकांत रंगणार काट्याची टक्कर

पैठण : तालुक्यातील महत्त्वाची संस्था मानल्या जाणाऱ्या पैठण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे सत्ताधारी व विरोधक दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी निवडणुकीसाठी कंबर कसल्याचे दिसत असून ही निवडणूक विधानसभेची रंगीत तालीम असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून निवडणुकीस पात्र कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया ७ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. त्यामुळे पैठण तालुक्यात आगामी निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. यापूर्वी ही बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम प्राधिकरणाच्या वतीने लावण्यात आला होता. परंतु सोसायटी व ग्रामपंचायत निवडणुका बाकी असल्याने त्यास स्थगिती मिळाली होती. आता मात्र, दोन्ही संस्थांच्या १० टक्क्यांहून अधिक निवडणुका झाल्या असल्याने यावेळी बाजार समितीची निवडणूक निश्चित मानली जात आहे.

पैठण तालुक्यात विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे उमेदवार संदीपान भुमरे हे विजयी झाले. परंतु यानंतर नुकत्याच घडलेल्या राज्यातील सत्तांतराच्या नाट्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत ते गेले असून त्यांना यामुळे दुसऱ्यांदा राज्यमंत्री मंडळात कॅबिनेट मंत्री पद मिळाले आहे. तर शिवसेना सोबत राष्ट्रवादी काँग्रेस असल्याने महाविकास आघाडीची बाजू मजबूत असल्याचे दिसून येते.

त्यामुळे या निवडणुकीत मंत्री भुमरे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे दत्ता गोर्डे, माजी आमदार संजय वाघचौरे, शिवसेना तालुकाप्रमुख मनोज पेरे यांचे आव्हान राहणार आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ. सुनील शिंदे यांनी शिवसेनेत असताना बाजार समितीचे सभापती पद भूषविले असून मंत्री भुमरे यांचे ते जुनेच सहकारी असल्याने यावेळी ते काय खेळी करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

दरम्यान, बाजार समिती शेतकऱ्यांशी निगडित महत्त्वाची संस्था मानली जाते. तालुक्याचे राजकारण या संस्थेच्या अवतीभोवती फिरते. या संस्थेची निवडणूक येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत परिणामकारक ठरत असल्याने त्याची रंगीत तालीम म्हणून बाजार समितीच्या निवडणुकीकडे बघितले जात आहे.

शिवसेना विरुद्ध शिवसेना आमने सामने

बाजार समितीच्या निवडणुकीत पैठण तालुक्यातील शिवसेना शिंदे गट व शिवसेना ठाकरे गट आमने सामने येणार आहे. शिंदे गट भाजपसोबत तर ठाकरे गट राष्ट्रवादीच्या सोबत जाण्याची शक्यता आहे. पैठण तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाची ताकद कमी झाली असली तरी राष्ट्रवादीच्या साहाय्याने शिंदे गटाचा सामना केला जाणार आहे. तर दुसरीकडे शिंदे गट व भाजप एकत्र लढण्याची तयारी असल्याने बाजार समितीत शिंदे गट-भाजप विरुद्ध ठाकरे गट- राष्ट्रवादी अशी काट्याची लढत होण्याची शक्यता आहे.