गुप्तधनाच्या आमिषाने अघोरी विधी;
परतूर पोलिसांची मध्यरात्री कारवाई
परतूर, ता. १२ (बातमीदार) : गुप्तधन मिळविण्याच्या आमिषाने मांत्रिकामार्फत शेतात अघोरी विधी सुरू असल्याची माहिती मिळताच परतूर पोलिसांनी मध्यरात्री घटनास्थळी धाव घेत कारवाई केली. ११ नोव्हेंबर रोजी रात्री १२.५० ला टाकळखोरे पोखरी-माहोरा परिसरातील शेतात हा प्रकार घडला.
परतूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संबंधित शेतात गुप्तधन मिळविण्याच्या उद्देशाने मांत्रिकामार्फत पूजा आणि विविध विधी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी काही व्यक्ती शेतात संशयास्पदरीत्या पूजा आणि विविध विधी करताना आढळून आल्या. पोलिसांनी संबंधित व्यक्तींकडे चौकशी केली असता, गुप्तधन मिळविण्यासाठी मांत्रिकामार्फत विधी सुरू असल्याचे समोर आले. घटनास्थळाची पाहणी केली असता विधीसाठी वापरण्यात येणारे लिंबू, हळद, कुंकू, सुपारी, तसेच खोदकामासाठी वापरण्यात येणारी छन्नी, हातोडा, कुदळ आणि अन्य साहित्य आढळले.
गुप्तधन मिळवून देण्याच्या नावाखाली नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या आणि समाजात अंधश्रद्धा पसरविणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहावे. अमानुष व अघोरी प्रथांना प्रोत्साहन देणाऱ्या प्रकारांची माहिती मिळाल्यास नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही कारवाई परीविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक रोहित कलमदाणे, पोलिस उपनिरीक्षक उद्धव चव्हाण, नंदू खंदारे, पोलिस अंमलदार अशोक गाढवे, सुरेश राठोड, महेश कोरडे, अतुल खंदारे, सुनील पवार आणि ज्ञानेश्वर वाघ यांनी केली.