जिल्ह्यात सावकारांचा विळखा कायम
--------------
-परभणी तालुक्यातच ८५ सावकार; सेलू तालुक्यात एकही नाही नोंदणीकृत
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता.३ ः बँका, पतसंस्था, शासनाच्या विविध कर्ज योजनांच्या माध्यमातून आर्थिक गरजा पूर्ण करण्याचे पर्याय उपलब्ध असतानाही परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेण्याचे प्रमाण कायम असल्याचे जिल्ह्यातील आकडेवारीवरून समोर आले आहे.
परभणी तालुक्यातील सावकारांनी वर्षभरात व्यापाऱ्यांना ८ लाख ४२ हजार रुपये, तर इतर कर्जदारांना २ लाख ६ हजार रुपये वितरित केले. तालुक्यातील एकूण कर्जवाटप १० लाख ४८ हजार रुपये इतके आहे. सावकारांची संख्या आणि त्यांनी केलेले कर्जवाटप या दोन्ही बाबींमध्ये परभणी तालुका सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. परभणीपाठोपाठ जिल्ह्यातील विविध तालुक्यांत परवानाधारक सावकारांकडून कर्जवाटप करण्यात आले आहे. जिंतूर तालुक्यात १० सावकारांनी २ लाख ८४ हजार रुपये, तर मानवत तालुक्यातील पाच सावकारांनी २ लाख ४७ हजार रुपयांचे कर्ज दिले आहे. सोनपेठमधील तीन सावकारांनी १ लाख ४३ हजार रुपये, गंगाखेडमधील सात सावकारांनी १ लाख ५१ हजार रुपये, पालममधील चार सावकारांनी १ लाख २५ हजार रुपये, तर पूर्णा तालुक्यातील सात सावकारांनी ८७ हजार रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांत कमी-अधिक प्रमाणात परवानाधारक सावकारांची नोंद असली, तरी सेलू तालुका या चित्राला अपवाद ठरला आहे. सेलू येथे एकही परवानाधारक सावकार नोंदणीकृत नसल्याने व्यापारी तसेच इतर कर्जदारांना अशा सावकारांकडून झालेल्या कर्जवाटपाची नोंदही शून्य आहे.
परभणी तालुक्यात ८५ सावकारांची उपस्थिती असताना सेलू तालुक्यात एकही परवानाधारक सावकार नसल्याचे विरोधाभासी चित्र आकडेवारीतून समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सावकारी व्यवसायाचे केंद्रीकरण काही तालुक्यांमध्ये अधिक असल्याचे दिसून येते.
------------
((चौकट)))
३० लाखांवर कर्ज वितरित
जिल्ह्यात नोंद असलेल्या १२५ परवानाधारक सावकारांनी वर्षभरात व्यापारी आणि इतर घटकांना एकूण ३० लाख ११ हजार रुपयांचे कर्ज वितरित केले आहे.
या कर्जवाटपात व्यापाऱ्यांना १८ लाख २३ हजार रुपये, तर इतर कर्जदारांना ११ लाख ८८ हजार रुपये देण्यात आले आहेत. सावकारांच्या संख्येचा विचार करता परभणी तालुका जिल्ह्यात आघाडीवर आहे. जिल्ह्यातील एकूण १२५ सावकारांपैकी ८५ सावकार एकट्या परभणी तालुक्यात आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ६८ टक्के परवानाधारक सावकार एकाच तालुक्यात असल्याचे दिसते.