फोटोसह
परभणी कडकडीत बंद! मराठा समाज रस्त्यावर
- मनोज जरांगे यांच्या उपोषणाला शहरात पाठिंबा
- सकाळपासून बाजारपेठा ठप्प; तरुणांची जोरदार घोषणाबाजी
- गावागावांतून कार्यकर्ते परभणीत दाखल; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. ३ ः मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे गुरुवारी (ता. तीन) पुकारण्यात आलेल्या बंदला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बुधवारी (ता. दोन) रात्री बंदची हाक देण्यात आल्यानंतर गुरुवारी सकाळपासूनच शहरातील प्रमुख बाजारपेठा, दुकाने आणि व्यावसायिक आस्थापना बंद राहिल्याने शहरातील नेहमीची वर्दळ मोठ्या प्रमाणात ठप्प झाली होती.
सकाळी अकराच्या सुमारास मराठा समाजातील तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. हातात भगवे झेंडे घेतलेल्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती. शहरातील विविध भागांतून कार्यकर्त्यांच्या घोषणा ऐकू येत होत्या. काही ठिकाणी उघडी असलेली दुकाने बंद करण्याचे आवाहन तरुण कार्यकर्त्यांनी केले. बंदला व्यापाऱ्यांनीही प्रतिसाद दिल्याने बाजारपेठांत शुकशुकाट दिसून आला. या बंदचे पडसाद केवळ परभणी शहरापुरते मर्यादित राहिले नाहीत. तालुक्यातील गावागावांतही बंद पाळण्यात आला. ग्रामीण भागातील अनेक तरुण मोटारसायकलींवरून सकाळपासूनच परभणी शहरात दाखल झाले होते. त्यामुळे शहरातील विविध रस्ते, चौकांत कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती जाणवत होती. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वातावरणात तणावाची छटा असली तरी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क होती. बंदचा परिणाम शाळांवरही जाणवला. सकाळच्या सत्रात भरलेल्या काही शाळांतून प्रार्थनेनंतर विद्यार्थ्यांना सोडून देण्यात आले. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शैक्षणिक कामकाजावरही बंदचा परिणाम झाला.
((चौकट)))
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
बुधवारी रात्रीपासूनच शहरातील प्रमुख चौक तसेच संवेदनशील परिसरांत अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले. गुरुवारी दिवसभर शहरातील जनजीवनावर बंदचा प्रभाव कायम राहिला. व्यापारी प्रतिष्ठाने बंद, रस्त्यांवरील वर्दळ कमी, ठिकठिकाणी कार्यकर्त्यांची उपस्थिती यातून मराठा आरक्षणाच्या मागणीला स्थानिक पातळीवर मिळालेला जोरदार पाठिंबा स्पष्टपणे दिसून आला.
-----------