युटिलिटी न्यूज
------------
ज्येष्ठांनो, पेन्शनसाठी तुम्हाला लाच
मागितल्यास ‘१०६४’ वर करा तक्रार
छत्रपती संभाजीनगर : पेन्शनसंदर्भातील कामे करून देण्यासाठी कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास घाबरून जाऊ नका. त्याऐवजी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार करावी. यासाठी टोल फ्री क्रमांक १०६४ वरही संपर्क साधता येईल, असा सल्ला विभागातर्फे ज्येष्ठांना देण्यात आला. २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त एसीबीच्या छत्रपती संभाजीनगर कार्यालयातर्फे गुरुवारी (ता.२९) निवृत्त नागरिकांसाठी जनजागृतीपर कार्यक्रम पार पडला. यात जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मोठा सहभाग नोंदविला होता.
निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन सुरू करणे, पेन्शनविषयक कागदपत्रांची पूर्तता, प्रलंबित प्रकरणे तसेच अन्य शासकीय कामांसाठी विविध कार्यालयांशी संपर्क साधावा लागतो. अशा वेळी एखादा सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्याने काम करून देण्यासाठी पैशांची मागणी केल्यास त्याला बळी पडू नका, उलट एसीबीशी संपर्क साधा, असेही आवाहन यावेळी करण्यात आले. एसीबीचे उपअधीक्षक प्रशांत पवार, पोलिस निरीक्षक धर्मराज बांगर, पीआय अमोल सोनवणे, पीआय प्रतिभा आबूज यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष वसंत सबनीस, उपाध्यक्ष डॉ. अरविंद देशमुख, सचिव नामदेव घुगे, सहसचिव पी.बी. क्षीरसागर, सदस्य रजनी नागवंशी, प्रमिला कुंभारे, लकेकर आदींची उपस्थिती होती.