
महापालिकेने नाकारलेले पाईप कंपनीने वापरले!
औरंगाबाद - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शहरात येणार असल्यामुळे शहराच्या नवीन पाणी पुरवठा योजनेच्या अडीच हजार मिलिमिटर व्यासाच्या मुख्य पाईपलाइनचे काम घाईगडबडीत सुरू करण्यात आले होते. त्यात आता महापालिकेने नाकारलेले पाईप कंत्राटदाराकडून वापरले जात असल्याच आक्षेप घेतला जात आहे. विशेष म्हणजे या पाईपवर गुणवत्तेबद्दलचा ‘आयएसआय’ची खूणही नाही. यापूर्वी समांतर पाणी पुरवठा योजनेचे काम करताना ‘आयएसआय’ खूण असलेले पाईप वापरण्यात आले होते.
राज्य शासनाने शहरासाठी मंजूर केलेल्या १६८० कोटींच्या पाणी पुरवठा योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणतर्फे केले जात आहे. प्राधिकरणाने पहिल्या टप्प्यातील १३०८ कोटी रुपयांची निविदा हैदराबाद येथील जीव्हीपीआर कंपनीला दिला दिली आहे. संथ कामामुळे ही कंपनी सध्या वादात सापडली आहे. वरिष्ठ पातळीवर झालेल्या बैठकीनंतर कंपनीने मुख्य पाईपलाईनचे काम सात जूनपासून सुरू केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीर सभेसाठी आठ जूनला शहरात येणार होते. त्यापूर्वी हे काम सुरू करण्यात आले. मात्र कामाच्या ठिकाणी केवळ सहा कामगार व एक पोकलेन मशीनच्या माध्यमातून हे काम सुरू आहे. २५०० मिलिमीटर व्यासाचे साडेसात मीटर लांबीचे पाच पाइप साइटवर नेण्यात आले आहेत.
या पाच पाईपवर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला होता. पाइपची कोटिंग योग्य पद्धतीने झालेली नाही, असा महापालिकेचा आक्षेप आहे. असे असताना हेच पाईप आंथरले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. समांतर पाणी पुरवठा योजनेसाठी पाच किलोमीटरची दोन हजार मिलिमिटर व्यासाची पाईपलाइन त्यावेळी टाकण्यात आली होती. ते पाईप आयएसआय खूण असलेले होते. पण जे पाईप टाकण्यात येत आहेत त्यांच्यावर आयएसआयची खूण नसल्याने त्यांच्या गुणवत्तेबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.
सुरुवातीला महापालिकेने जे पाईप नाकारले होते, ती पहिली खेप होती. सध्या पाईपांची जाडी, कोटिंग निकषानुसारच आहे. आयएसआय मार्क एका ब्रँडसाठी असतो. ते मानांकन एखादे कार्यालय देखील करून घेऊ शकते. आम्ही बीआयएस (ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स) नुसार काम करीत आहोत. पाईपांसाठीच्या निविदेत देखील त्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
- अजयसिंह, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.
Web Title: Pipes Used By Corporation Were Rejected By Company
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..