
Aurangabad: लुटमारी करणारे दोघे ताब्यात; शिवराई रस्त्यावर थरार,अखेर ‘त्या’ दोघांना बेड्या ठोकल्या
वैजापूर- वैजापूर तालुक्यातील शिवराई रस्त्यावर शस्त्राने मारहाण करुन रोड लुटमारी करणाऱ्या दोघांच्या वैजापूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून पुढे चोर, मागे पोलिस असा हा थरार तब्बल तीन तास सुरु होता.
अखेर चोरांनी पुरणगाव रस्त्यावर कार सोडून शेतात पळ काढल्यानंतर पोलिसांनी तब्बल दोन किमी पाठलाग करून दोन चोरांना बेड्या ठोकल्या. मात्र इतर दोन आरोपी हे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सौरभ ऊर्फ बाबू विकी रुझासिओ (वय १९ वर्षे रा. ईनामवाडी, शिर्डी ता.जि. अहमदनगर), कृष्णा प्रकाश भोळे (वय २४ वर्ष रा.आंबेडकर नगर ता.सिन्नर जि.नाशिक) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास डायल ११२ वर माहिती मिळाली की, शिवराई शिवारात रोडने जाणाऱ्या दोन मोटार सायकल स्वारांना पांढऱ्या रंगाची बोलेरो गाडीमध्ये (क्र.एमएच २३ एडी-१२१६) असलेल्या चार जणांनी लोखंडी रॉड,
चाकू असे घातक शस्त्रांनी मोटार सायकल स्वारांना व सोबतच्या महिलांना मारहाण सोने व पैसे लुटून नेल्याची माहिती मिळाली.
तसेच बोलेरो वाहन हे लासूर स्टेशनच्या दिशेने गेल्याची समजले. त्यामुळे पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी तत्काळ स्वतः वायरलेस द्वारे सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी करण्याचे आदेश दिले.
तसेच वैजापूर उपविभागातील सर्व पोलिस ठाणे अंतर्गत पोलिसांची पथके तयार करून त्यांना संशयित वाहनाला पकडण्याच्या सूचना दिल्या. यानंतर त्वरित वैजापूर पोलिसांनी तीन पथक तयार करून एक पथक शिवराई, करंजगाव रस्त्यावर रवाना केले.
तर दुसरे पथक डॉ. आंबेडकर पुतळा वैजापूर येथे व तिसरे पथक गंगापूर चौफूली नाकाबंदीसाठी लावले. यावेळी चोरांच्या वाहनाने आंबेडकर चौकातील नाका बंदी ही भरधाव वेगाने तोडून पुढे येवला रोड रोडच्या दिशेने सुसाट वेगाने निघाले. वैजापूर पोलिसाच्या सर्व पथकांनी वाहनाचा मागे पाठलाग सुरू केला.
हा थरार रात्रीच्या दोन वाजेपर्यंत सुरू होता. पोलिस मागावर असल्याचे बघून आरोपींनी त्यांचे वाहन पुरणगाव रोडने नेऊन शेतीच्या कडेला लावून वाहन लॉक करून अंधारात शेताच्या दिशेने पळत सुटले. यावेळी मागावर असलेल्या पोलिसांनी सुद्धा त्यांचा शेवटपर्यंत पाठलाग सुरू ठेवून अंधाऱ्या शेतामध्ये दोन किलोमीटर पर्यंत पळत जाऊन दोन चोरट्यांच्या मुसक्या आवळून त्यांना जेरबंद केले. यावेळी दोन आरोपी हे अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी ठरले.
ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींकडून दोन लोखंडी रॉड, एक बोलेरो गाडी जप्त करण्यात आले आहे.
या घटनेमध्ये जखमी ज्ञानेश्वर सुभाष डुकरे (वय २६ होमगार्ड रा.तिडी, ता.वैजापूर) यांचा जबाब नोंदवून कलम ३९४ भादंविप्रमाणे वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक मनीष कलवानीया,
अपर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवर, उपविभागीय पोलिस अधिकारी मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय लोहकरे, पोउपनि मनोज पाटील, पोउपनि रज्जाक शेख, सफौ. महादेव निकाळजे, विठ्ठल जाधव, पोलिस अंमलदार योगेश झाल्टे, भगवान सिंघल, प्रशांत गिते, विजय भोटकर, वाल्मीक बनगे, गोरक्ष सदगीर, नवनाथ केरे, नवनाथ निकम, ज्ञानेश्वर पाडळे, गणेश पैठणकर, सीमा जाधव, तीन होमगार्ड यांच्या पथकाने केली.