Chhatrapati Sambhajinagar News : जगण्यानेच नाही तर मरणानेही छळले; पैशांअभावी थांबला होता अंत्यविधी

रोज कमावले तरच त्याच्या कुटुंबीयांच्या पोटाची आग विझते. त्यात कधी हाताला काम मिळाले नाही तर तेच हात भिकेसाठी इतरांपुढे पसरावे लागतात.
Life
Lifesakal

छत्रपती संभाजीनगर - रोज कमावले तरच त्याच्या कुटुंबीयांच्या पोटाची आग विझते. त्यात कधी हाताला काम मिळाले नाही तर तेच हात भिकेसाठी इतरांपुढे पसरावे लागतात. राहायला घर नसल्याने रेल्वे स्थानक परिसरातील पुलाखालीच संसार थाटला. क्षणाक्षणाला जगणे असे छळत होते.

अशातच त्याचा आजाराने गुरुवारी (ता. दोन) उपचारादरम्यान मृत्यू झाला. एकवेळच्या जेवणासाठीच कुटुंबीकडे पैसे नसतात; तिथे अंत्यविधीसाठी पैसे कुठून आणणार, हा प्रश्न होता. त्यामुळे अंत्यविधी थांबला होता. काही सामाजिक कार्यकर्ते आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता मदतीला धावल्याने शुक्रवारी (ता. तीन) अंत्यविधी पार पडला.

मूळ बीड जिल्ह्यातील रहिवासी आणि सध्या रेल्वे स्थानक परिसरातील पुलाखाली राहणाऱ्या एका कुटुंबातील २५ वर्षीय तरुणाला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्याच्या नातेवाइकांनी गुरुवारी सकाळी दहा वाजल्याच्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) त्याला दाखल केले. त्यानंतर डॉक्टरांनी तपासून औषधे दिली. परंतु, गुरुवारी सायंकाळी त्याचा मृत्यू झाला.

शुक्रवारी पोलिसांनी पंचनामा केला. उत्तरीय तपासणी केल्यानंतर अंत्यविधीसाठी मृतदेह संबंधित कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. मात्र, मृताच्या कुटुंबीयांकडे अंत्यविधी करण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे काय करावे, कसे करावे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला.

एकीकडे आभाळाएवढे दुःख तर दुसरीकडे त्याहीपेक्षा मोठी वाटणारी पैशाची अडचण यामुळे तरुणाचे कुटुंब हवालदिल झाले. त्यांची ही अवस्था पाहून पोलिस कर्मचारी समद पठाण यांनी बाळासाहेब गायकवाड यांना फोन केला. त्यांनी फोनपेवर दोन हजार रुपये पाठवले. पण, अंत्यसंस्कारासाठी अजून पैसे लागणार होते.

त्यानंतर पठाण यांनी सामाजिक कार्यकर्ते किशोर वाघमारे यांना कळवले. वाघमारे यांनी घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांना याबाबत कल्पना दिली. त्यांनी अंत्यविधीसाठी लागणारे उर्वरित पैसे पाठवले. कुठल्याही प्रकारची अडचण आली तर माझ्याशी संपर्क करा असेही त्यांनी सांगितले.

यानंतर वाघमारे यांच्यासह मुख्तार खान, अझहर शेख यांनी बेगमपुरा स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी केला.

माणुसकीची पुन्हा एकदा प्रचिती

घाटीत येणाऱ्या अनेक रुग्णांकडे उपचार, जेवण आणि गावी जाण्यासाठी पैसे नसतात. अशांना परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, घाटीतील डॉक्टर, कर्मचारी, अधिकारी नेहमीच मदत करतात. या घटनेमुळे त्याची प्रचिती पुन्हा एकदा आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com