पॉप्युलर फ्रंटच्या राज्य अध्यक्षाला दहा दिवसांची पोलिस कोठडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Popular Front state president remanded police custody for 10 days aurangabad

पॉप्युलर फ्रंटच्या राज्य अध्यक्षाला दहा दिवसांची पोलिस कोठडी

औरंगाबाद : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा (पीएफआय) राज्याचा अध्यक्ष शेख नासेर शेख साबेर यास २ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एल. मोरे यांनी शुक्रवारी (ता. २३) दुपारी दिले. पीएफआय या संघटनेवर देशात विघातक कृत्याचा कट रचून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आहे. गुरुवारी (ता.२२) पहाटे देशभर त्यांच्या कार्यालयांवर एनआयए व एटीएसने छापे टाकून १०६ जणांना अटक केलेली आहे. यात औरंगाबादमधून तीन तर जालन्यातील एकाचा समावेश आहे. गुरुवारी रात्री कल्याण येथून आणलेले शेख नासेर शेख साबेर यास अटक केल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकातील सूत्रांनी दिली.

औरंगाबादमधून अटक केलेल्यांमध्ये शेख इरफान शेख सलीम ऊर्फ मौलाना इरफान मिल्ली (३७, रा. किराडपुरा), सय्यद फैजल सय्यद खलील (२८, रा. रोजेबाग), परवेज खान मुजम्मील खान (२९, रा. जुना बायजीपुरा) व जालन्याच्या अब्दुल हादी अब्दुल रऊफ (३२, रा. रहेमान गंज) या चौघांनाही दहा दिवसांची पोलिस कोठडी दिलेली आहे. न्यायालयात सहायक लोकाभियोक्ता विनोद कोटेचा आणि दहशवादी विरोध पथकाचे सहायक आयुक्त सुनील तांबे यांनी शेख नासेर शेख साबेर याला पोलिस कोठडी देण्याची विनंती केली.

एक वर्षापासून होती पाळत

पीएफआय या संघटनेच्‍या कृतीवर एटीएस सुमारे वर्षभरापासून नजर ठेवून होती. संघटनेच्‍या माध्यमातून देशविघातक कृत्‍याची आखणी करण्यात येत असल्याचे समोर आले असे गुरुवारी न्यायालयासमोर सांगितले होते. शुक्रवारी शेख नासेर शेख साबेर हा संघटनेचा राज्याध्यक्ष असल्याचे न्यायालयापुढे सांगून पंधरा दिवसांची पोलिस कोठडी देण्याची विनंती केली. न्यायालयाने २ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Web Title: Popular Front State President Remanded Police Custody For 10 Days Aurangabad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..