Latur News : सामूहिक शेतीतून बांबू लागवड शक्य ; पंकजा मुंडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Possible bamboo cultivation from collective farming Pankaja Munde latur
लातूर : सामूहिक शेतीतून बांबू लागवड शक्य ; पंकजा मुंडे

लातूर : सामूहिक शेतीतून बांबू लागवड शक्य ; पंकजा मुंडे

लातूर : सामूहिक शेती हे माझे स्वप्न आहे. अल्पभूधारक किंवा भूमिहीन शेतकऱ्यांसाठी ते वरदान आहे. सामूहिक शेतीत रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून बांबू लागवड शक्य आहे. त्यातून शेतकऱ्यांच्या हाती अधिकचे चार पैसे पडतील, असे मत भाजपच्या नेत्या, माजीमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्रच्या पतपुरवठ्यातून कलाम कृषी शेतकरी उत्पादक कंपनी अंतर्गत लोदगा येथे उभारल्या जाणाऱ्या पहिल्या स्वयंचलित बांबू फर्निचर उद्योगाच्या भूमिपूजनप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे होते. आमदार अभिमन्यू पवार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, बँक ऑफ महाराष्ट्राच्या झोनल मॅनेजर के.दुर्गा सुनीता, माजी आमदार पाशा पटेल, नितीन कोतवाल, कृषी विभागाचे अधिकारी क्षीरसागर, लोदग्याचे सरपंच पांडुरंग गोमारे उपस्थित होते.

शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळावे यासाठी पाशा पटेल यांनी आजपर्यंत लढा दिला आहे. आता ते बांबू या विषयात काम करत आहेत. शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून सर्वांनीच काम केले पाहिजे. बांबू लागवडीतून चांगला फायदा होऊ शकतो. शेकडो एकर गायरान जमिनी आजही उपलब्ध आहेत. सामूहिक शेती करत रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून या जमिनीवर बांबू लागवड करता येईल. त्याचा शेतकऱ्यांना लाभ होईल, असे मुंडे म्हणाल्या. पाशा पटेल हे कृषी क्षेत्रातील क्रांतिकारक झाले आहेत. पाशा पटेल व बांबू लागवड हे समीकरण झाले असून कधीही न थांबणारा नेता अशी त्यांची ओळख झाली आहे, असे आमदार पवार म्हणाले. परवेज पटेल, अमर पटेल, किशोर साळुंके आदी उपस्थित होते.

बांबू लागवडीसंदर्भात पटेल यांनी देशभरात दीड हजारापेक्षा अधिक सभा घेतल्या आहेत. पर्यावरण रक्षणासाठी वृक्षलागवड गरजेची आहे. त्यासाठी शासनाने ‘माझी वसुंधरा’ अभियान सुरू केले आहे. या अंतर्गतही बांबू लागवड करता येईल.

- संजय बनसोडे, राज्यमंत्री

लोदगा येथे सुरू होणाऱ्या बांबू फर्निचर उद्योगासाठी पुढील दोन महिन्यांत ११ सीएनसी मशीन बसविण्यात येणार आहेत. यंत्रांच्या माध्यमातून हा उद्योग गतिमान होणार आहे.

- पाशा पटेल

Web Title: Possible Bamboo Cultivation From Collective Farming Pankaja Munde Latur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top