आ. बंब यांना लॉटरी लागलीच नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prashant bamb

आ. बंब यांना लॉटरी लागलीच नाही

खुलताबाद - गंगापूर-खुलताबाद मतदार संघातून सलग तीनदा निवडून आलेले आणि दोन्ही तालुक्यात जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती नगरपरिषदेत एकहाती सत्ता टिकविणारे आ. प्रशांत बंब यांचे मंत्रिपदासाठी नाव चर्चेत नव्हते. मात्र, अचानक त्यांना लॉटरी लागू शकेल, अशी आशा तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना होती. त्यांचा मंत्रिपदाची लॉटरी न लागल्याने तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची निराशा झाली.

याबाबत मंत्रिमंडळ शपथविधी पार पडल्यानंतर दोन्ही तालुक्यातील समाज माध्यमाच्या विविध ग्रुपवर जोरदार चर्चा सुरू होती. खुलताबाद-गंगापूर मतदार संघात पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून येताना अपक्ष निवडणूक लढवीत आमदार बंब यांनी बाजी मारली. त्यानंतरच्या दुसऱ्यांदा त्यांनी भाजपचे कमळ तालुक्यात फुलविले. त्याचबरोबर ग्रामपातळीवर पक्ष मजबुतीसाठी परिश्रम घेतले.

तालुक्यात सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून कुणीही निवडून आलेले नाही. मात्र, या परंपरेला छेद देत पुन्हा ते तिसऱ्यांदा निवडून आले. गंगापूर-खुलताबाद विधानसभेचे तिसऱ्याला प्रतिनिधित्व करताना दोन्ही तालुक्यातील जि.प., पं.स तसेच नगरपरिषदेवर निर्विवाद पकडही मिळविली. तालुक्यातील तळागाळातील शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोचविण्यासाठी समांतर यंत्रणा उभी करून सर्व योजनांचा लाभही देण्याचा प्रयत्न केला. एवढे असतानाही मतदार संघाला अर्थातच आ.बंब यांना मंत्रिपदाने यंदाही हुलकावणी दिल्याने मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. याबाबत समाज माध्यमाच्या विविध ग्रुपवर दिवसभर तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या.