सुरांच्या मैफलीतून `पुनश्च हरिः ओम''चा स्नेहबंध दरवळला!
अनुराधाताई नांदेडकर यांना संगीत साधनांची अनोखी दिवाळी भेट; गायक व संगीतप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग
हिंगोली : दिवाळीचा आनंद संगीताच्या सुरांनी द्विगुणित करत हिंगोलीतील गायक आणि संगीतप्रेमींनी पुनश्च हरिः ओम या स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून अनोखा उपक्रम राबविला. संगीत साधना विद्यालयाच्या संस्थापिका, गायिका आणि संगीत शिक्षिका अनुराधाताई नांदेडकर यांना संगीत साधनांची अनोखी दिवाळी भेट देऊन त्यांच्या संगीत साधनेप्रती असलेल्या योगदानाचा सन्मान करण्यात आला.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अनादी मी, अनंत मी या अजरामर गीताने कार्यक्रमाची सुरवात झाली. यावेळी संगीत साधना विद्यालयाचे विद्यार्थी कुशल यंबल, अमृता भालेराव आणि ज्योत्स्ना लखमवार यांनी ‘कराओके’च्या माध्यमातून विविध गीते सादर केली. नव्या संगीत साधनांच्या साथीने सादर झालेल्या सुरेल गीतांनी उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.
या उपक्रमासाठी सतीश विडोळकर, लक्ष्मीकांत शिरडकर, नितीन कामतीकर, नंदकिशोर भालेराव, संजय घवाड, संतोष डोईफोडे, नितीन बेले, अमृता भालेराव, ज्योत्स्ना लखमवार यांनी पुढाकार घेतला. डॉ. किसन लखमवार, डॉ. जवळेकर, डॉ. संजय नाकाडे आणि कैलास असेगावकर यांचेही योगदान लाभले. महेश पेंडके यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी डॉ. गोविंद भालेराव, शैलेश नांदेडकर यांनी पुढाकार घेतला.