राज ठाकरे औरंगाबादेत आले, पण कोरोनाने केला मूड ऑफ

Raj Thackeray
Raj Thackeray

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेना छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार साजरी करणार असल्याचे घोषित करण्यात आले होते. त्यानुसार गुरुवारी (ता. १२) शिवजयंती साजरी करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे बुधवारीच (ता. ११) मोठा जामानिमा घेऊन औरंगाबादेत डेरेदाखल झाले होते. पण कोरोनाने घात केला आणि पोलिसांनी त्यांना मिरवणुकीला परवानगी नाकारत कार्यक्रमाचाच बेरंग केला. 

राज ठाकरे यांच्यासह त्यांचे पुत्र आणि मनसेच्या शॅडो कॅबिनेटमधील उमदे मंत्री अमित ठाकरे हेही शहरात आले होते. अमित ठाकरे यांच्याच नेतृत्त्वात मिरवणूक काढत त्यांच्या लॉंचिंगला शक्तिप्रदर्शनाची तयारी मनसैनिकांनी चालवली होती. पक्षाचे बदललेले धोरण आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरे यांची औरंगाबाद शहरात शिवजयंतीसाठी उपस्थिती राजकीयदृष्टीने महत्त्वाची मानली जात होती.

शिवजयंतीच्या तयारीसाठी मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते झटून कामाला लागले असतानाच कोरोनाचे संकट ओढवले आणि कार्यकर्त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. तरीही हिंमत एकवटून त्यांनी तयारी सुरूच ठेवली. शहरभर बॅनर लागले, स्वागताची जय्यत तयारी झाली आणि पाल चुकचुकली. अखेर त्यांची भीती  खरी ठरली. प्रशासनाने सर्वत्र जमावबंदीचे धोरण अवलंबल्यामुळे मनसेच्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली. 

औरंगाबादेत शिवजयंती साजरी करताना क्रांतीचौकात राज ठाकरे स्वतः शिवपूजन करणार आहेत. यानंतर सायंकाळी संस्थान गणपती येथून मिरवणूक काढली जाणार होती. पण आता पोलिसांनी परवानगी नाकारल्याचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. 

महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या नारळाचे काय?

आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांकडून तयारी केली जात असताना मनसेने संभाजीनगरचा मुद्दा उचलून धरला आहे. गेल्या महिन्यात राज ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा घेत जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. औरंगाबादचा दौरा संपवून मुंबईत परतल्यानंतर काही दिवसांतच मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना १२ मार्चला तिथीनुसार शिवजयंती साजरी करणार असल्याचे कळविण्यात आले होते.

एवढेच नाही, तर स्वतः राज ठाकरे औरंगाबादेत येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. आता उद्या गुरुवारी (ता. १२) तिथीनुसार शिवजयंती साजरी करीत मनसे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळच फोडणार होती. पण आता त्यांना पोलिस परवानगीच नाकारल्यामुळे मनसेचा इथेही फियास्को होणार का, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com