राष्ट्रीय राजकारणाच्या पटलावरील हिंगोलीचा तारा निखळला!

देशात काँग्रेसला घरघर लागली असताना पक्षाचे खासदार राजीव सातव यांचा अकाली मृत्यू होणे हे पक्षाचे मोठे नुकसान आहे.
राजीव सातव
राजीव सातव

देशात काँग्रेसला घरघर लागली असताना पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ता तथा राज्यसभेचे खासदार राजीव सातव (Rajee Satav) यांचा अकाली मृत्यू होणे हे पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील (Marathwada) मागास अशा हिंगोली (Hingoli) जिल्ह्याचे नाव त्यांनी देशपातळीवर नेले आहे. राजीव सातव यांच्याविषयी काही आठवणी पत्रकार गजानन जोगदंड यांनी जागवल्या आहेत....

राजकारण असो की समाजकारण व आणखी कोणता प्रश्न आपल्या सतत कार्यशील, सतत प्रयत्नरत असणारे तसेच प्रश्न सोडविण्याची हातोटी राखणारे हिंगोली जिल्ह्याचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे अकाली निधन झाले. त्यांच्या निधनाने राजकारणातील हिंगोलीची राष्ट्रीयस्तरावरील ओळख पुसली गेली आहे. त्यांच्या निधनाने सर्वच राजकीय पक्षांच्या नेते पुढाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे. हा धक्का एवढा मोठा आहे, की कोणालाही काय बोलावे आणि काय लिहावे? हेही कळेनासे झाले आहे. खासदार सातव यांना राजकारणाचे धडे त्यांच्या मातोश्री रजनीताई सातव यांच्याकडून मिळाले, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. मात्र राजकारणाची मोठे पार्श्वभूमी असतानाही त्यांनी आपली राजकीय कारकीर्द पंचायत समिती निवडणुकीपासून सुरू केली. सभापती, जिल्हा परिषद सदस्य व पुढे २००९ साली कळमनुरी विधानसभा (Kalamnuri Constituency) मतदारसंघाचे आमदार म्हणून ते निवडून आले. कळमनुरीचे आमदार म्हणून ते एकाच प्रयत्नात निवडून आले. त्यानंतर २०१४ साली लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या लाटेत भाजप-शिवसेना युतीचे तत्कालीन उमेदवार सुभाष वानखेडे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. महाराष्ट्रातील काँग्रेसचे आस्तित्व केवळ आणि केवळ हिंगोलीचे खासदार राजीव सातव व नांदेडचे (Nanded) खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी राखले होते. सातव यांच्या लोकसभेवर खासदार म्हणून विजय झाल्यानंतर जिल्ह्यातील विकासाचे विविध प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत.

राजीव सातव
खासदार राजीव सातव यांच्या निधनाने हिंगोली लोकसभा मतदार संघावर शोककळा

शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्‍न असो रस्त्याचा प्रश्न असो किंवा अन्य कोणताही प्रश्‍न असो तो लोकसभेत मांडून सभागृहाचे लक्ष वेधून ते घेत असत. लोकसभेच्या अधिवेशनात राजीव सातव हिरीरीने सहभागी घेत. हिंगोली जिल्ह्यातील प्रश्न मांडत असत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन लोकसभेने त्यांना संसदरत्न पुरस्काराने सन्मानीत केले. राजीव सतत सर्वसामान्य, शेतकरी व व्यापारी यांचे प्रश्न सोडवीत असत. तसेच त्यांची नाळ तळागाळातील लोकसमुहाशी ही जोडलेली होती. प्रश्न कोणताही असो व कोणाचाही असो प्रश्‍न घेऊन येणार याकडे राजूभाऊ अगदी हसतमुखपणे पाहात असत आणि त्यांना प्रश्न सोडण्याची ग्वाही मिळत असे. त्यांचा हसतमुख चेहरा पाहून त्यांच्याकडे येणाऱ्यांचे अर्ध्याहून अधिक कष्ट तेथे संपत असत. आपल्या खासदारपदाच्या कार्यक्रम देणे त्यांनी जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या तळागाळातील लोकांच्या व व्यापाऱ्यांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले होते. त्यांना हिंगोलीचे लाडके खासदारही म्हटले जात असे.

२०१९ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत खासदार राजीव सातव यांना पक्षश्रेष्ठीने निवडणुकीत उतरवले नव्हते. मात्र याआधी गुजरात विधानसभा निवडणुकीत त्यांच्यावर या राज्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. युवक काँग्रेसचे सचिवपद लाभलेले राजूभाऊ यांनी गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत मोठा लढा उभारला होता. राजकीय द्वेषातून त्यांच्यावर हल्लाही झाला. यात ते जखमी देखील झाले. मात्र त्यांनी रणभूमी सोडली नाही. परंतु विधानसभेच्या निवडणुकीचा कौल भाजपच्या दिशेने लागला या निवडणुकीत गुजरात येथे काँग्रेस पक्षाला मोठे यश मिळवून देण्यात राजूभाऊंचा सिंहाचा वाटा राहिला. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन हिंगोली येथून पुढे त्यांना राज्यसभा सदस्य म्हणून काँग्रेसने स्वीकृती दिली. राज्यसभेचे खासदार झाल्यानंतर राजूभाऊंनी हिंगोली जिल्ह्याचे विकासाचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले. १९ एप्रिल रोजी त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या निधनाने दिल्ली तक्तावरील हिंगोलीची ओळख पुसली गेली आहे. पुन्हा असा नेता होणे नाही, अशा प्रतिक्रिया सर्वपक्षीय नेत्यांमधून उमटत आहेत.

सर्वसामान्यातील असामान्य नेता

खासदार सातव यांना जवळून पाहण्याचा योग मला लाभला. आमच्या दैनिकाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते करण्याचे ठरविले होते, तेव्हा राजीव सातव युवक काँग्रेसचे सचिव होते. त्यांच्यामागे प्रश्नांचा गराडा सतत राहत असे. प्रश्न सोडविण्यात राजूभाऊ प्रश्न सोडविण्यात मग्न असत. अनेकदा कामाचा व्याप मोठा असल्याने त्यांना बाहेरगावी थांबावे लागत असे. मात्र आमच्या दैनिकाच्या प्रारंभप्रसंगी राजीव सातव उशिरा का होईना पण आले होते. राजीव सातव यांच्याकडे येणाऱ्या सर्वांचेच दुःख व वेदना स्वतःच समजून त्या सोडवत असत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com