रामलिंग अभयारण्यात पुन्हा वाघाचे दर्शन
शेतातील तलावावर पाणी पिण्यासाठी आला; वन विभागाकडून ट्रॅप कॅमेरे बसविले
-----
येडशी, ता. १७ : येथील प्रसिद्ध रामलिंग अभयारण्य परिसरात पुन्हा एकदा वाघाचे दर्शन झाले आहे. सुळकी शेतातील तलावातून पाणी पिऊन परतताना एका शेतकऱ्याच्या नजरेस हा वाघ पडला.
येडशी येथील रहिवासी तानाजी नलावडे नेहमीप्रमाणे गुरांचे दूध काढण्यासाठी शेताकडे जात होते. दरम्यान, सुळकी शेत परिसरातील तलावाजवळ त्यांना १५० ते २०० फूट अंतरावरून तलावातील पाणी पिऊन जंगलाच्या दिशेने परतणारा वाघ अचानक दिसून आला. नलावडे यांनी प्रसंगावधान राखत आपल्या वाहनाचा हॉर्न सतत वाजवण्यास सुरवात केली. हॉर्नच्या मोठ्या आवाजामुळे वाघ जंगलाच्या दाट झाडीत गेला.
-----
काही दिवसांपूर्वीच गायीची शिकार
काही दिवसांपूर्वीच याच परिसरात शरद नलावडे यांच्या गायीची वाघाने शिकार केली होती. त्या घटनेनंतर वन विभागाने संबंधित ठिकाणी पाहणी केली असता वाघाच्या पायाचे ठसे (पगमार्क) आढळून आले होते. आताही वन विभागाने पाहणी केल्यानंतर त्या ठिकाणी पगमार्क आढळून आले आहेत.
-----
सुळकी शेत परिसरात वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. त्याची हालचाल कैद करण्यासाठी ट्रॅप कॅमेरे बसविले आहेत. मागील काही दिवसांपासून हा वाघ सतत भ्रमंती करत असल्याचे दिसून येत आहे. पूर्वीप्रमाणे निश्चित एका ठिकाणी तो फार काळ थांबत नसल्याचे आढळून आले आहे.
-पूनम बधे, वनपरिक्षेत्र अधिकारी
-----
OSM26B07022
येडशी : रामलिंग अभयारण्य परिसरात आढळून आलेले वाघाच्या पायाचे ठसे.