Aurnagabad : कच्चा आराखडा गुरुवारी होणार सादर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कच्चा आराखडा गुरुवारी होणार सादर

कच्चा आराखडा गुरुवारी होणार सादर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीचा प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार गुरुवारी (ता. १८) राज्य निवडणूक आयोगाला कच्चा आराखडा सादर केला जाणार आहे. कोरोना संसर्गामुळे महापालिकेची लांबणीवर पडलेली निवडणूक आगामी काही महिन्यांत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानुसार राज्य शासनाने पावले उचलली आहेत. महापालिकेची आगामी निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार घेण्याचा निर्णय सुरुवातीला घेण्यात आला. त्यानंतर शहराच्या वाढीव लोकसंख्येनुसार नगरसेवकांची संख्या देखील वाढवण्यात आली.

औरंगाबाद महापालिकेतील नगरसेवकांची संख्या अकराने वाढून ११५ वरून १२६ वर जाणार आहे. राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्य निवडणूक आयोगाने प्रभागांची रचना करून कच्चा आराखडा १८ नोव्हेंबरपर्यंत सादर करा असे आदेश महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी अधिकाऱ्यांची समिती नियुक्त केली असून, या समितीमार्फत वॉर्ड व प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यात आला आहे. यासंदर्भात उपायुक्त संतोष टेंगळे यांनी सांगितले की, कच्चा आराखडा तयार करण्यात आला आहे, त्यावर अखेरचा हात फिरविला जात आहे. प्रशासक श्री. पांडेय सध्या शहरात नसल्याने त्यांच्यासोबत ऑनलाइन पद्धतीने संवाद साधून प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा अंतिम केला जात आहे.

loading image
go to top