
करातून वसुली, वेतनावर खर्च
औरंगाबाद : महापालिकेने नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात विक्रमी ४१५ कोटी रुपयांची वसुली केली आहे. आता २०२२-२३ या वर्षात मालमत्ता करापोटी ३५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले तर मालमत्ता करातून वसूल झाली तेवढी रक्कम अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतन, भत्त्यावर खर्च होणार आहे. चालू आर्थिक वर्षासाठी वेतन, भत्त्यांसाठी ३५३. ३५ कोटी रुपयांची तरदूत केली आहे.
महापालिकेचे १७२८ कोटी १५ लाख ८० हजार रुपयांचे बजेट नुकतेच मंजूर करण्यात आले आहे. त्यात २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा प्रशासकीय खर्च ३५३.३५ कोटी एवढा अपेक्षीत असल्याचे सांगण्यात आले.त्यात महापालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनावर २४१.९३ कोटी रुपये, खासगी तत्त्वावरील कर्मचाऱ्यांचे वेतन २८.५५ कोटी, वैद्यकीय खर्च प्रतिपुर्ती एक कोटी रुपये, इतर प्रशासकीय खर्च १४ कोटी रुपये, सेवानिवृत्त वेतन व इतर ६७.८७ कोटी रुपये खर्च याप्रमाणे ३५३.३५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. तसेच शिक्षण विभागासाठी ५.२५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
त्यातून विज्ञान व गणित प्रयोग शाळा कार्यान्वित करणे व विज्ञान साहित्य पुरविणे, गाईड व इतर साहित्य पुरविणे, कॉम्प्युटर लॅब, ई-लर्निंग डिजिटल क्लास रुम, सहलीचे आयोजन करणे, मोफत बस पास सेवा अशा सुविधा विद्यार्थ्यांना दिल्या जाणार आहेत.
पथदिव्यांवर होणार ३२ कोटींचा खर्च
शहरातील जुने पथदिवे बदलून नवे एलईडी पथदिवे लावण्यासाठी महापालिकेने कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. कंत्राटदाराने शहरात ५४ हजार पथदिवे लावले आहेत. या पथदिव्यांच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी कंत्राटदाराकडेच आहे. कंत्राटदाराच्या वार्षिक बिलापोटी अंदाजपत्रकात ३२.६४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
Web Title: Recovery From Taxes Expenses On Wages Rs 353 Crore On Salaries And Allowances Of Officers And Employees Aurangabad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..