esakal | औरंगाबादेत देवळाई म्हाडातील रहिवाशी पंधरा वर्षांपासून सुविधाविना
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad

औरंगाबादेत देवळाई म्हाडातील रहिवाशी पंधरा वर्षांपासून सुविधाविना

sakal_logo
By
सुनिल इंगळे

औरंगाबाद: सातारा-देवळाई येथील म्हाडा कॉलनीत गेल्या पंधरा वर्षांपासून रहिवाशांना विविध सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. हजारो लोक राहत असलेल्या या नागरी वसाहतीत प्राथमिक शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्र नसून भूमिगत गटार, कीटकनाशक फवारणी, परिसराची नियमित साफसफाई नसल्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंदर्भात वारंवार निवेदन देऊनही याकडे म्हाडा व महानगरपालिकाचे दुर्लक्ष होत असून नागरी सुविधा देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

म्हाडातर्फे सातारा परिसरात पंधरा वर्षांपूर्वी सुमारे दोनशे निवासी नागरी वसाहत निर्माण केली. घर वाटपदरम्यान करारानुसार सर्व नागरी सोयी-सुविधा पुरविण्यात येईल अशी हमी दिली होती; परंतु अद्याप याबाबत कोणतीच सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्यामुळे म्हाडाच्या वतीने कराराचा भंग झाला आहे. यासंदर्भात निवेदन स्वराज्य म्हाडा कृती समितीतर्फे म्हाडा कार्यालयाला देण्यात आले आहे. २०१६ ला हद्द विस्तारीकरणामध्ये या वसाहतीचा महापालिका यादीमध्ये समावेश करण्यात आला. परंतु महानगरपालिकेने भरमसाट करवसुली करून सुद्धा सदर वसाहतीला पिण्याच्या पाण्यासह कोणत्याच सोयी सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत.

हेही वाचा: तब्बल बारा वर्षांनंतर औरंगाबाद विमानतळाला पाणी मिळालं

दरम्यान, अनेक वर्षांपासून वसाहतीमध्ये भूमिगत गटारीचे योग्यरीत्या व्यवस्थापन न केल्यामुळे ठिकठिकाणी गटार फुटली असून गटारीचे दुर्गंधीयुक्त घाण पाणी घरासमोर साचत आहे. नियमित साफसफाई, कीटकनाशक फवारणी नसल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दरम्यान, परिसरात लहान मुलांसाठी प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, उद्यान, कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची नळाद्वारे व्यवस्था, भूमिगत गटार, नियमित साफसफाई, कीटकनाशक फवारणी, परिसरात पथदिवे लावावेत अशा विविध मागण्यांचे निवेदन 'स्वराज्य म्हाडा कृती समिती'तर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी व महानगरपालिकेला देण्यात आले. या निवेदनावर समितीचे अध्यक्ष शैलेश माने, उपाध्यक्ष पी.एस.कोचार,अनिल ढोबळे, सचिव संजय वाघ, सल्लागार अशोक बोर्डे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.