Aurangabad News | पती-पत्नीतील वादावर उपायाच्या बहाण्याने लुटले सोने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad

औरंगाबाद : पती-पत्नीतील वादावर उपायाच्या बहाण्याने लुटले सोने

औरंगाबाद : ‘हर समस्या का समाधान’ नावाचा बोर्ड वाचून महिलेने त्यावर संपर्क करत पती-पत्नीच्या भांडणाची कैफीयत मांडली खरी, मात्र उपाय तर दूरच परंतू संशयित महिलेसह एका पुरुषाने तिचे जवळपास दीड लाखांचे दागिने हातचलाखीने लंपास केले अन् महिलेच्या हातात गव्हाच्या पीठाचा गोळा ठेवलेला डब्बा दिला. यातून फसवणूक झाल्याचे समोर येताच दोघांविरोधात गुन्हा दाखल होऊन दिल्लीतील एक महिला, एक पुरुष अशा दोघांना शुक्रवारी वाळूजमधून अटक करण्यात आली. हा प्रकार ६ फेब्रुवारीरोजी घडला होता.

अबीद रशीद आणि नगिना खान (दोघेही रा. गाझियाबाद, दिल्ली) अशी अटकेतील दोघा आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी शाकेरा वजीर शेख (३२, रा. नारायणपुर, वाळुज ता.गंगापूर) या ५ फेब्रुवारीला शहागंजमध्ये गेल्या होत्या. कपडे खरेदी करत असताना त्यांना एका छापील पत्रकावर ‘हर समस्या का समाधान’ असे लिहलेले दिसले. शाकेरा यांनी त्या क्रमांकावर संपर्क साधत पती-पत्नीत भांडणे होतात असे सांगितले असता संशयित नगिना हिने पूजा- विधी करावे लागतील. त्यासाठी सोबत दागिने घेऊन या असे म्हणत उस्मानपूरा भागातील जामा मस्जिद समोरील आलिशान कॉम्प्लेक्सच्या गाळा क्र. २ येथे बोलावून घेतले.

लुटमार करून दिल्लीला जाऊन पुन्हा औरंगाबादेत

शाकेरा यांचे दागिने लुबाडून या भोंदू जोडप्याने ६ फेब्रुवारीलाच गाझियाबादकडे धूम ठोकली होती. दरम्यान, उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय गायकवाड, योगेश गुप्ता, हरीष चंद्र लांडे पाटील, संदीप धर्में, अश्रफ सय्यद, सतीश जाधव हे तपास करत होते. त्याचदरम्यान दोन्ही भोंदू हे वाळूज भागात आल्याची माहिती मिळताच उपनिरीक्षक गायकवाड यांनी पथकासह धाव घेत दोघांना शुक्रवारी बेड्या ठोकल्या. दोघा आरोपींना न्यायालयाने ८ दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याचे तपास अधिकारी उपनिरीक्षक गायकवाड यांनी सांगितले.

क्षणात गायब केले दागिने

सहा फेब्रुवारीला शाकेरा बहिणीसह तेथे गेल्या. त्यावेळी त्यांच्याकडून सर्व वैयक्तिक, पारिवारिक माहिती दोघा भोंदू आरोपींनी विचारून घेतली. एक विधी करण्यास सांगत आरोपींनी जमिनीवर रुमाल अंथरुन त्यावर शाकेरा यांना दागिने ठेवण्यास सांगितले. त्यानुसार शाकेरा यांनी दोन तोळ्यांचे गंठण, तीन तोळ्यांचे दोन नेकलेस आणि पाच ग्रॅमचे कर्णफुले असे एक लाख ६५ हजार रुपयांचे दागिने त्या रुमालात ठेवले. त्या रुमालाला भोंदूनी गाठ मारली. मात्र, त्यापूर्वी हातचलाखीने सर्व दागिने लांबवून रुमालावर तांदूळ, धागा ठेवला. तो रुमाल सकाळी घरी गेल्यावर उघडा असे सांगितले. त्यानंतर शाकेरा या घरी निघून गेल्या. दुसऱ्यादिवशी रुमाल उघडून पाहिले तर त्यात गव्हाच्या पिठाचा गोळा होता. फसवणूक झाल्याचे उस्मानपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

किरायाचा गाळा, लुबाडणूक अन् चार दिवसांत पसार

गाझियाबाद, दिल्ली येथून अबीद रशीद आणि नगिना खान हे दोघे आरोपी रेल्वेने औरंगाबादेत आले. त्यांनी उस्मानपूरा भागातील जामा मस्जिद समोरील आलिशान कॉम्प्लेक्समध्ये गाळा किरायाने घेतला. त्यासाठी दोन हजार रुपये मालकाला ऍडव्हान्स दिले. तसेच रिक्षा, बसस्थानक, रेल्वेस्थानक अशा सार्वजनिक ठिकाणी कौटुंबिक, पती-पत्नीमधील वादावर रामबाण उपाय अशी जाहिरात पत्रके मोठ्याप्रमाणात वितरित केली. त्यात शाकेरा या जाळ्यात अडकल्या. त्यांचे दागिने लुटून दोघेही गाझियाबादला पसार झाले होते. त्यांच्याकडे रेल्वेचे तिकीटही सापडल्याचे निरीक्षक बागवडे यांनी सांगितले.