औरंगाबादमध्ये पिस्टलचा धाक दाखवत भरदिवसा पेट्रोल पंपावर दरोडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

daulatabad

या घटनेनंतर व्यवस्थापकाने दौलताबाद पोलिस ठाण्यात दूरध्वनीवरून घटनेची माहिती पोलिसांना दिली

औरंगाबादमध्ये पिस्टलचा धाक दाखवत भरदिवसा पेट्रोल पंपावर दरोडा

माळीवाडा (औरंगाबाद): येथे भरदिवसा पेट्रोल पंपावर दरोडा पडला आहे. पिस्टल आणि चाकूचा धाक दाखवत मोटरसायकलवरून आलेल्या दोन दरोडेखोरांनी हा धाडसी दरोडा टाकला आहे. गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास तोंड बांधून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी पंपावरील कर्मचाऱ्यांना भेटून सांगितले की, आम्ही बाहेरगावाहून आलो आहे. आमच्याकडे असलेले नगदी पैसे संपले असून गुगलपेवर अथवा पेटीएमवर आम्ही तुम्हाला पैसे पाठवतो तुम्ही आम्हाला कॅश द्या, असे म्हणत मोबाईलमधील कोड स्कॅन केला. नंतर काही काळ पंपावर घुटमळत पंपाची संपूर्ण पाहणी केली. थोड्यावेळाने ते तिथून निघून गेले. परत एक तासानंतर दहाच्या सुमारास पंपावर येत व्यवस्थापकाच्या रूममध्ये प्रवेश करत तिथे नगदी मोजत असलेल्या व्यवस्थापक व तीन कर्मचाऱ्यांना बंदूक व सुरा रोखत मोजत असलेली रक्कम अंदाजे एक ते सव्वा लाख रुपये घेऊन शहराच्या दिशेने पोबारा केला.

या घटनेनंतर व्यवस्थापकाने दौलताबाद पोलिस ठाण्यात दूरध्वनीवरून घटनेची माहिती पोलीसांना दिली. निरीक्षक राजश्री आडे यांनी तत्काळ घटनास्थळ गाठत माहिती जाणून घेतली व तपासाला सुरुवात केली आहे. घटनास्थळी पोलिस आयुक्त निखिल गुप्ता, उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, सहायक आयुक्त विवेक सराफ यांनी भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली व तपासाचे निर्देश दिले आहेत. माळीवाडा गावात असलेल्या या पंपावर दिवसा ढवळ्या हा दरोडा पडल्याची खबर परिसरात वाऱ्यासारखी पसरली यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा: चक्क उभ्या पेट्रोल टँकरचे नऊ टायर नटबोल्ट खोलून पळवले

या घटनेच्या पूर्वसंध्येला म्हणजेच बुधवारी सायंकाळी शेतातून काम आटोपून एक शेतकरी महिला घराकडे परतत असताना तिच्या मागून येऊन एका इसमाने मंगळसूत्र हिसकावण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. त्या महिलेची पोत मजबूत असल्याने ती लवकर तुटली नाही व जास्त झटापट झाल्यानंतर त्या महिलेने त्या चोराचा गळा पकडला परंतु तो चोर शिताफीने पळून गेला. अशा छोट्या-मोठ्या घटना या भागात घडत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :daulatabad