
Sambhaji nagar : कोंबड्या चोरून खाल्ल्या म्हणून लाकडी दांड्याने मारहाण
कन्नड : कोंबड्या चोरून खाल्ल्याच्या आरोपावरून निमडोंगरी (ता.कन्नड) येथील दोन कुटुंबात मंगळवारी (ता.१४) दुपारी दोन वाजता जोरदार लाकडी दांड्याने हाणामारी झाली. यात एक जण गंभीर जखमी झाला असून चार जणांविरुद्ध कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या संदर्भात सहायक पोलिस निरीक्षक तात्याराव आर. टी. भालेराव यांनी सांगितले की, सागर माणिकराव काकडे यांनी फिर्याद दिली, त्यात नमुद केले की, कोंबड्या चोरून खाल्ल्याची विचारणा केली असता अर्जुन संतोष ठाकरे, करण संतोष ठाकरे, संतोष कोतवाल ठाकरे, वंदना संतोष ठाकरे या यांनी काठी व लाकडी दांड्याने मारहाण करून डोके फोडले.
यात सागर गंभीर जखमी झाला. तर दोन गटात झालेल्या हाणामारीत संतोष कोतवाल ठाकरे हे सुद्धा गंभीर जखमी झाले. या सर्वांना कन्नड ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात
आले. संतोष कोतवाल ठाकरे यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना छत्रपती संभाजी नगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल कैलास करवंदे हे करीत आहे.