Sambhaji nagar : कंपनीला लावला सव्वा कोटींचा चुना Sambhaji nagar Chikalthana Industrial Estate company 1.5 crore applie | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

Sambhaji nagar : कंपनीला लावला सव्वा कोटींचा चुना

छत्रपती संभाजीनगर : सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या दोघांनी स्वतःच्या नावाने दुसरी कंपनी सुरु केली अन् सॉफ्टवेअर कंपनीचा डेटा चोरुन स्वतःच्या कंपनीसाठी वापरला. यात त्रयस्थ कंपन्यांना स्वतःच्या नावाने काढलेल्या कंपनीकडून कमी दराचे कोटेशन देत सॉफ्टवेअर कंपनीला तब्बल एक कोटी १२ लाख ८७ हजार ७३७ रुपयांचा चुना लावल्याचा प्रकार उघडकीस आला.

हा प्रकार डिसेंबर २०२१ ते जुलै २०२२ दरम्यान एमआयडीसी चिकलठाण्यातील एका कंपनीत घडला. याप्रकरणी फसवणूक करणाऱ्या दोघांविरोधात एमआयडीसी सिडको पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. बालाजी मनी मोपनर (रा. मिलेनियम पार्क, छत्रपती संभाजीनगर) आणि संजीव बच्छीराम भट (रा. २०३, सीएचएस हीरा नंदानी, ठाणे पश्चिम) अशी दोघा आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी प्रताप हरिदास धोपटे (५१, रा. भारतनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, धोपटे यांची चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत बांधकाम क्षेत्रातील विविध प्रकारचे सोल्युशन्स देणारी सॉफ्टवेअर कंपनी असून ते स्वतः कंपनीचे सीईओ तथा व्यवस्थापकीय संचालक आहेत. संशयित आरोपी संजीव भट हा फेब्रुवारी २०२० पासून जनरल मॅनेजर सेल्स आणि मार्केटिंग या पदावर आणि आरोपी बालाजी हा प्रोजेक्ट मॅनेजर या पदावर धोपटे यांच्या कंपनीत जुलै २०२० पासून कार्यरत होते.

असे झाले उघड

कंपनीच्या एचआर मॅनेजरला आरोपी बालाजी याच्या कंपनीतील वर्तणुकीवर संशय आला. त्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आयटी टीमच्या मदतीने बालाजीला दिलेल्या लॅपटॉपवर नजर ठेवली असता, बालाजीने कंपनीचा डेटा चोरुन इतर कंपन्यांना दिल्याचे समोर आले. बालाजी आणि संजीव हे दोघे धोपटे यांच्या कंपनीत नोकरी करत असतानाही दोघांनी बिल्ड लाइव्ह इंडिया एलपीपी ही कंपनी सुरु केल्याचे उघडकीस आले.

तसेच दोघा आरोपींनी नवीन क्लायंट मिळतील या पद्धतीची धोपटेंच्या कंपनीची गोपनीय माहिती इतर कंपन्यांना दिली, इतकेच नव्हे धोपटे यांच्या कंपनीशी संपर्क साधणाऱ्या सहा कंपन्यांना स्वतःच्या बिल्ड लाइव्हकडे वळवित त्यांना कमी दराचे कोटेशन देत धोपटे यांच्या कंपनीची तब्बल १ कोटी १२ लाख ८७ हजार ७३७ रुपयांची फसवणूक केली.

विशेष म्हणजे दोघा आरोपींची धोपटे यांच्या कंपनीतील वागणूक एच आर विभागाला संशयास्पद असल्याचे निदर्शनास येताच कंपनी प्रशासनाच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यांनी ऑडिट केले असता, दोघांनी कोटीमध्ये फसवणूक केल्याचे ऑडिटमध्ये उघडकीस आले.

याप्रकरणी धोपटे यांच्या फिर्यादीवरून दोघा आरोपींविरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक गौतम पातारे हे करत आहेत.