Sambhaji Nagar : यंदा दहावी, बारावीच्या परीक्षेत सर्वाधिक गैरप्रकार | Sambhaji nagar examination started, incidents of copying 10th, 12th exams year This copy exam! | SSC HSC Exam News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

copy case Sambhaji Nagar News

Sambhaji Nagar : यंदा दहावी, बारावीच्या परीक्षेत सर्वाधिक गैरप्रकार

छत्रपती संभाजीनगर : दरवर्षी शासन व शिक्षण विभागाकडून दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षेसाठी कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येते. मात्र, यंदा परीक्षा सुरू होताच अनेक केंद्रांवर विद्यार्थ्यांकडून कॉपी करण्याच्या घटना समोर आल्या.

यामध्ये विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यात अनेक ठिकाणी केंद्रसंचालक, शिक्षकांचाच सहभाग असल्याचे आढळून आले. त्यामुळे या परीक्षा कॉपीमुक्त होत्या की कॉपीयुक्त, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Latest Marathi News)

परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सोलापूर, नगर, भंडारा, यवतमाळ जिल्ह्यांतील अनेक शाळांमध्ये परीक्षेवेळी विद्यार्थ्यांकडून कॉपीसारखे अनेक गैरप्रकार घडल्याचे समोर आले.

शिक्षण खात्याने चौकशीचे आदेश काढले आहेत. मात्र, या प्रकारांमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली.

बैठे पथकच मॅनेज

शिक्षण विभाग व प्रशासनाकडून यंदा कॉपीमुक्त अभियानासाठी उपद्रवी केंद्रावर बैठे पथक तैनात केले होते. मात्र, अनेक केंद्रावर बैठे पथकच मॅनेज झाल्याचे दिसून आले.

एखाद्या उपद्रवी केंद्रावर भरारी पथक दाखल झाल्यास थोड्याच वेळात वरिष्ठ अधिकाऱ्यांना लोकनेते फोन करून पथक हलविण्याच्या सूचना देत होते, असे भरारी पथकातील काही अधिकाऱ्यानी सांगितले.

कॉपीचा अजब खेळ

भरारी पथकातील एका अधिकाऱ्याने सांगितले, की बाहेरून साजरे दिसणारे केंद्र आत गेल्यावर त्याचे खरे रूप कळायचे. मुलांना चक्क केंद्रसंचालक, पर्यवेक्षकच कॉपी पुरवत होते.

भरारी पथकाच्या अधिकाऱ्याने कॉपी पकडल्यास पाय पकडून सॉरी म्हणत राहायचे. जोपर्यंत पेपर देत नाही, तोपर्यंत पाय सोडायचे नाहीत, असा कानमंत्रच केंद्रसंचालकांनी विद्यार्थ्यांना दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्यभरातील विद्यार्थी परीक्षेला जिल्ह्यात

राज्यभरात दहावी, बारावी परीक्षेत ३०० पेक्षा जास्त गैरप्रकार घडले आहेत, त्यापैकी छत्रपती संभाजीनगर विभागात तब्बल १३५ गैरप्रकार घडले. ५० हजारांत पास करण्याच्या हमी मिळाल्याने परजिल्ह्यातील अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातील केंद्रांवर केवळ परीक्षेसाठी जिल्ह्यात दाखल झाल्याचे आढळून आले.

काही केंद्रांवर भरारी पथक तळ ठोकून राहिल्याने या विद्यार्थ्यांना कॉपी करता आली नाही. त्यामुळे नापासची भीती सतावत असल्याने संबंधित विद्यार्थी विद्यालयाकडे पैसे परत करण्याची मागणी करत आहेत, असे एका संस्थाचालकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

यंदा सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद

यंदाच्या दहावी, बारावी परीक्षेदरम्यान आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे दहा गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यात औरंगाबाद, पुणे व नागपूर प्रत्येकी दोन; तर अमरावती विभागात तीन आणि मुंबई विभागाअतंर्गत एक गुन्ह्याची नोंद आहे.

विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या केंद्रावर जास्त प्रमाणात गैरप्रकार घडत असल्याचे दिसत आहे. शिक्षण विभाग व बोर्डाने या विनाअनुदानित शाळा, कॉलेजांना केंद्र देताना विचार करावा. त्यानंतरच कॉपीमुक्त अभियान यशस्वीपणे राबविता येईल.

- वाल्मीक सुरासे, विभागीय सचिव, राज्य शिक्षण संस्था महामंडळ