वेग मर्यादा ओलांडणाऱ्या वाहनचालकांचे सक्तीचे समुपदेशन केले जाणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Samruddhi Express Way

समृद्धी महामार्गावरून मर्यादेपेक्षा जास्त वेगाने जाताय तर आधीच सावध व्हा. कारण समृद्धीवरील अपघात रोखण्यासाठी आता परिवहन विभाग सक्रिय झाला आहे.

Samruddhi Express Way : वेग मर्यादा ओलांडणाऱ्या वाहनचालकांचे सक्तीचे समुपदेशन केले जाणार

छत्रपती संभाजीनगर - समृद्धी महामार्गावरून मर्यादेपेक्षा जास्त वेगाने जाताय तर आधीच सावध व्हा. कारण समृद्धीवरील अपघात रोखण्यासाठी आता परिवहन विभाग सक्रिय झाला आहे. वेग मर्यादा ओलांडणाऱ्या वाहनचालकांचे सक्तीचे समुपदेशन केले जाणार आहे. अमरावती, नागपूर येथे समुपदेशन केंद्र सुरू झाली असून, लवकरच प्रत्येक जिल्ह्याच्या हद्दीत समुपदेशन केंद्र सुरू करण्यात येत आहेत. शिवाय प्रसंगी ‘त्या’ चालकाची ‘परीक्षा’ही घेतली जाईल.

या उपाययोजनांसाठी नुकतीच छत्रपती संभाजीनगरात बैठक घेण्यात आली. समृद्धी महामार्गावर अपघाताची संख्या वाढली आहे. त्यामुळेच परिवहन आयुक्तालयाच्या राज्य रस्ता सुरक्षा कक्षाचे प्रमुख उपायुक्त भारत कळसकर यांच्या अध्यक्षतेखाली सावंगी इंटरचेंज येथे नुकतीच बैठक झाली. या बैठकीला छत्रपती संभाजीनगर, जालना, श्रीरामपूर येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी, तसेच रस्ते विकास महामंडळ, समृद्धीच्या ठेकेदार कंपनीसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

अशी होईल कार्यवाही

  • समृद्धीवर ट्रकसाठी ताशी ८० तर मोटार व हलक्या वाहनांसाठी १२० किलोमीटर वेग निश्चिती

  • ही वेग मर्यादा ओलांडल्याचे लक्षात येताच पुढील समुपदेशन केंद्रावर चालकाला थांबविणार

  • चालकाचे एक ते दोन तास सक्तीने समुपदेशन होईल.

  • अपघाताच्या परिणामाच्या ध्वनिफिती दाखवण्यात येणार

  • चालकाकडून प्रश्नपत्रिका सोडवून घेणार

  • दंडात्मक कारवाईही केली जाणार असल्याचे

हृदयस्पर्शी ओळींच्या पाट्या

समृद्धी महामार्गावरील अपघात कमी करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. त्यात महामार्गावर ठिकठिकाणी आपत्कालीन दूरध्वनी क्रमांक, रस्ता सुरक्षेचे फलक लावणे, विविध सूचना देणारे डिजिटल एलईडी फलक लावणे, टायरमध्ये किती हवा असावे अशा सूचनांचे फलक लावले जात आहेत. विशेष म्हणजे सूचनांचे फलकांवर हृदयस्पर्शी मजकूर असावा, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. याबाबतची माहिती कळसकर यांनी दिली.

समृद्धी महामार्ग अत्यंत सरळ आणि विनाअडथळ्यांचा आहे. तरीही अपघात का होतात हा खरा प्रश्न आहे. म्हणूनच महामार्गावर जाताना काय काळजी घ्यावी, टायरमध्ये हवा किती असावी, वाहनाची स्थिती कशी असावी याविषयी प्रबोधन केले जाणार आहे. यासाठी जिल्हानिहाय आठ समुपदेशन केंद्रे सुरू होत आहेत.

- भारत कळसकर, उपायुक्त राज्य रस्ता सुरक्षा कक्ष, परिवहन विभाग