छत्रपती संभाजीनगर - ‘समातंरची योजना कुणामुळे गेली. कुणाचा वाद होता. कोण मातोश्रीवर जावून भेटत होते. कुणी टक्केवारी खाल्ली, हे सर्वश्रुत आहे. हे सर्व त्यांच्याच काळातील पाप आहे. आता तोच शिवसेना उबाठा गट स्टंटबाजी करून लोकांना मुर्ख बनवत आहे.
त्यांचेच टॅंकर वाहतुकदार, त्यांचीच टॅंकर लॉबी जाणीवपुर्वक हे करताहेत. पाणीपुरवठ्यात अडचणी आणून टॅंकर वाढवून व्यवसाय वाढवण्याचाही हा प्रकार आहे.’ असा आरोप पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केला.
शिवसेना उबाठा गटाकडून सुरू असलेल्या ‘लबाडांनो पाणी द्या!’ या आंदोलनावर सोमवारी (ता. २१) ते माध्यमांशी बोलत होते. पालकमंत्री शिरसाट म्हणाले, आजही १४० एमएलडी पाणी येत नाही. केवळ ११० ते १२० एमएलडी पाणी येते. २० ते ३० टक्क्यांपर्यंत गळती, अनधिकृत नळ आहेत. ९० एमएलडी पाण्यातून शहराला पाणीपुरवठा करतांना लोकसंख्या लक्षात घेता तुट येते.
सिडकोला जिथे पाच एमएलडी पाणी लागत होते. त्या भागात आज लोकसंख्या वाढीमुळे तिथे २६ एमएलडीपेक्षा अधिक पाणी लागते. शहराला २४० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. नव्या योजनेतून ३५० एमएलडी पाणी मिळेल. त्याआधारे २४ तास पाण्याची घोषणा नव्या योजनेच्या आधारावरील आहे.
त्या अधिकाऱ्यांची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करणार
पाण्याच्या लाईन वेडीवाकडी नसावी. पण, मजिप्रचे अभियंते विद्वान असतांना अशी घोडचुक व्हायला नको होती. २५००, ९०० आणि ७०० ची पाईपलाईन जवळजवळ असतांना काळजी घेणे दोघांची संयुक्त जबाबदारी होती. यात महावितरणही सहकार्य करत नसुन आडमुठ्या भुमिकेमुळे शहरवासियांना त्रासाला सामोरे जावे लागले.
शंभर फुटावर तीन ठिकाणी पाण्याची लाईन एल आकारात वळवण्यात आली. त्यामुळे वारंवार तिथेच पाईपलाईन फुटत होती. ती लाईन सरळ करून स्वतंत्र लाईन टाकण्याचा निर्णय घेतला. त्याला तिन चार दिवसांचा वेळ लागला. ते काम पुर्ण झाल्याने पाणीपुरवठा आता सुरळीत झाला.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि मनपाच्या अभियंत्यांनी हे काम वेळीच योग्य पद्धतीने केले असते तर शहरातील नागरीकांना पाण्यासाठी मनस्थाप सहन करावी लागला नसता. त्यांची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत. असे शिरसाट यांनी सांगितले.
मुख्यमंत्री मुंबईत घेणार बैठक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या आठवड्यात नवीन पाणीपुरवठा योजनेत काय अडचणी, पाणीपुरवठ्यासाठी काय काम केले आणि पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी तसेच योजना लवकर पुर्ण होण्यासाठी काय लागणार या तीन मुद्द्यांवर आठवडाभरात बैठक घेणार आहे. असे पालकमंत्री शिरसाट म्हणाले.
महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी टक्केवारी घेतली
‘उबाठाने समांतर योजना पुर्ण होऊ दिली नाही. टक्केवारीच्या हव्यासात शहराला वेठिस धरण्याचे काम त्यांनी केले. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी ते केले. आताचे काम पुर्ण करू देण्यासाठी त्या कंपनीला ११० कोटी द्यावे लागले. हे चटके कुणामुळे बसले. हे सर्व टक्केवारीवरून घडले. महापालिकेत तेच सत्ताधारी होते. त्यांनी टक्केवारी घेतली त्यामुळे ही योजना गुंठाळली गेली.’ आरोपही शिवसेनेवर (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संजय शिरसाट यांनी केला.
आता नवी डेडलाईन नाही, रोजचे अपडेट घेतोय
नव्या पाईपलाईनमधून पाणी मिळण्याची आता नवीन डेडलाईन नाही. या योजनेवर लक्ष ठेवून असलेले उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती, मनपा आयुक्त आणि पालकमंत्र्यांना नव्या पाणी पुरवठा योजनेचे रोजचे काय काम झाले याचा दररोजचा अहवाल देण्याच्या सुचना संबंधितांना दिल्या आहेत.
कंत्राटदाराची मुदत संपली आहे. त्याला अडिचशे ते तिनशे कोटींची वाढही दिली. त्यामुळे त्याने काम जलदगतीने करण्याच्या सुचना दिल्या असून रात्रंदिवस काम सुरू आहे. असे ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.