सतीश साबळे यांची
राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. १४ ः बुलडाणा येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय वरिष्ठ गट योगासन स्पर्धेत जिल्ह्याचे सुपुत्र आणि योगपटू सतीश साबळे यांनी आपल्या बहारदार सादरीकरणाच्या जोरावर कांस्यपदक पटकावले आहे. या देदीप्यमान यशाच्या जोरावर त्यांची आगामी राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.
महाराष्ट्र योगासन स्पोर्टस असोसिएशन आणि बृहन्महाराष्ट्र योग परिषद यांच्या मान्यतेने बुलडाणा जिल्हा योगासन स्पोर्टस असोसिएशन’च्या वतीने या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राज्यभरातील कानाकोपऱ्यांतून आलेल्या योगपटूंनी सहभाग नोंदवला होता. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या स्पर्धेत साबळे यांनी आपल्या शरीरसौष्ठव, लवचिकता, समतोल आणि कौशल्यपूर्ण योगासनांच्या जोरावर उपस्थितांची व परीक्षकांची मने जिंकत कांस्यपदकावर आपले नाव कोरले.
....
जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव
राज्य स्तरावर चमकदार कामगिरी करून राष्ट्रीय संघात स्थान मिळवल्याबद्दल धाराशिव जिल्हा योगासन स्पोर्टस असोसिएशनचे अध्यक्ष अतुल अजमेरा, उपाध्यक्ष गौरव बागल व स्वाती लाकाळ, सचिव स्वाती गडदे, सहसचिव राजेश बिलकुले व योगेश थोरबोले, कोषाध्यक्ष अभय वाघोलीकर तसेच सदस्यांनी साबळे यांचे अभिनंदन केले. साबळे आगामी राष्ट्रीय स्पर्धेतही आपल्या कौशल्याची छाप पाडून महाराष्ट्राला आणि धाराशिव जिल्ह्याला सुवर्णयश मिळवून देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
......
योगपटू सतीश साबळे
फोटो ः OSM26B06984