ऊसतोड कामगारांच्या हंगामी वसतिगृहांची लगबग
स्थलांतर वाढल्याने यंदा विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याचा अंदाज
छत्रपती संभाजीनगर, ता. १८ : ऊसतोडणीच्या हंगामात कामगार कुटुंबांचे स्थलांतर झाल्याने त्यांच्या मुलांचे शिक्षण आणि पोषण आहार खंडित होऊ नये, यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने हंगामी वसतिगृहांसाठी प्रस्ताव मागवले आहेत. ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत ही वसतिगृहे चालवली जातात. यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ऊसतोडणीसाठी अधिक कामगार स्थलांतरित होण्याची शक्यता असल्याने वसतिगृहांतील विद्यार्थ्यांची संख्याही वाढण्याचा अंदाज आहे.
जिल्ह्यातील पैठण, गंगापूर आणि वैजापूर तालुक्यांतून मोठ्या प्रमाणावर कामगार ऊसतोडणीसाठी बाहेर जातात. त्यांच्या मुलांचे शिक्षण सुरू राहावे, यासाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत निवासी किंवा अनिवासी हंगामी वसतिगृहे चालवली जातात. मराठवाड्यातील बीड आणि परभणीच्या तुलनेत छत्रपती संभाजीनगरात कामगारांच्या स्थलांतराचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे जिल्ह्यात दरवर्षी प्रस्तावांनुसार चार ते पाच ठिकाणीच वसतिगृहांची व्यवस्था केली जाते. या हंगामी वसतिगृहांतील मुलांना सकाळी नाश्ता आणि सायंकाळी जेवण दिले जाते. दुपारचे जेवण शालेय पोषण आहार योजनेतून मिळते. सकाळपासून सायंकाळपर्यंत मुलांची देखभाल वसतिगृह चालकांकडून केली जाते. रात्री मुले त्यांचे आजी-आजोबा किंवा नातेवाइकांकडे राहतात. यासाठी प्रतिविद्यार्थी प्रतिमाह १,६६७ रुपये, म्हणजेच सहा महिन्यांसाठी सुमारे १० हजार रुपये दिले जातात.
----
चाऱ्यासाठी कामगारांकडून ऊसतोड
चारा उपलब्धतेसाठी ऊसतोड यंत्रांऐवजी कामगारांकडून ऊसतोड करून घेण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत नुकताच मांडण्यात आला. त्यानुसार शासनाकडे मागणी केली जाणार आहे. त्यामुळे रोजगारासाठी स्थलांतर वाढून हंगामी वसतिगृहांतील विद्यार्थ्यांची संख्याही वाढू शकते, असा अंदाज समग्र शिक्षा अभियानाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.