esakal | Aurangabad: द. मा. मिरासदारांची पहिली नोकरी औरंगाबादेतील
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad: द. मा. मिरासदारांची पहिली नोकरी औरंगाबादेतील

Aurangabad: द. मा. मिरासदारांची पहिली नोकरी औरंगाबादेतील

sakal_logo
By
मनोज साखरे -सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : सुप्रसिद्ध विनोदी लेखक, कथाकथनकार व परळी येथे झालेल्या ७१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. द. मा. मिरासदार यांचे औरंगाबादशी एक वेगळे नाते अन् ऋणानुबंध होता. त्यांच्या नोकरीचा श्रीगणेशा औरंगाबादेत झाला. देवगिरी महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापकाची नोकरी काही काळ केली होती. त्यांच्या लेखनालाही येथूनच सुरुवात झाली व मराठी साहित्य विश्‍वात ते ख्यातकीर्द झाले.

प्रा. द. मा. मिरासदार यांचे शिक्षण अकलूज, पंढरपूर येथे झाले. पुण्यात एम‌ए व त्यानंतर त्यांनी काही वर्षे पत्रकारी केली. पुण्याच्या कॅंप एज्युकेशनच्या शाळेत ते शिक्षक होते. १९६१ मध्ये ते मराठीचे प्राध्यापक झाले. त्यांनी सुरुवातीची नोकरी औरंगाबादेत केली.परळी येथे १९९८ ला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्याअर्थाने मराठवाड्याशी व खासकरून ग्रामीण जीवनाशी त्यांचे नाते लेखणीसोबतच जिव्हाळ्याचेही होते. ‘एक डाव भुताचा’ आणि ‘ठकास महाठक’ या दोन चित्रपटांच्या संवादलेखनाबद्दल त्यांना पारितोषिके मिळाली आहेत. ‘व्यंकूची शिकवणी’ या त्यांच्या गाजलेल्या विनोदी कथेवरून ‘गुरुकृपा’ हा मराठी चित्रपट काढण्यात आला होता.

मिरासदारांच्या कथा विनोदी असतानाही त्यात कारुण्य होते

(रा. रं. बोराडे) : प्रा. द. मा. मिरासदार देवगिरीला प्राध्यापक असताना मी एम. ए. करीत होतो. माझे तेव्हापासून त्यांच्याशी ऋणानुबंध होते. माझी ‘पेरणी’ हा कथासंग्रह त्यांच्यामुळेच प्रकाशित झाला. त्यांनी केवळ ग्रामीण कथेलाच नव्हे तर एकूणच मराठी कथेला योगदान दिले. त्यांच्या कथा वरकरणी विनोदी असल्या तरीही त्यात कारुण्य, विसंगती एवढ्या खोलवर जडलेली असायची की त्यांची कथा त्यांचीच असायची. त्यांच्या पिढीतच त्यांच्या कथांचे कुणालाही अनुकरण करता आले नाही व आमच्या पिढीत त्यांचा वारसा कुणी चालविलेला नाही. कथाकथन ते एवढे उत्कृष्ट करायचे. केवळ शहरातीलच नव्हे तर ग्रामीण लोकांपर्यंत त्यांच्या कथा पोचली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

पाझर प्रवाहित करणारी लेखणी थांबली

(ऋषिकेश कांबळे) : मराठी कथाविश्‍वाला द. मा. मिरासदार यांच्या लेखनाने विलक्षण प्रतिष्ठा प्राप्त करून दिली होती. स्वातंत्र्यलढा सुरू असताना ग्रामीण जीवनातील माणसांच्या मनांचे वेध घेणारे वाङ्‍मय निर्माण होत होते. यंत्रयुगाचा प्रभाव त्याकाळी नव्हता, अशा काळात मराठी माणसांच्या मनाची मशागत करण्याची मोठी जबाबदारी मिरासदारांच्या लेखणीने पार पाडली. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर, संविधानाचा अंमल सुरू झाल्यानंतर ग्रामीण जीवनापर्यंत वारा पोचलेला होता. त्यातील वैचित्र्यपूर्णता नेमकेपणाने मांडणाऱ्या तीन कथाकारांत मिरासदारांचा समावेश होतो. माणसांच्या मनाचा पाझर प्रवाहित करणारी लेखणी आता थांबल्याचे मनस्वी दुःख होत आहे.

मराठी सारस्वतांचे नुकसान

(दत्ता भगत) : मिरासदारांच्या लेखनाच्या कारकिर्दीला सुरुवात मराठवाड्यातून झाली व येथून ते महाराष्ट्र पातळीवर पोचले व ख्यातकीर्द झाले. दीर्घ मराठी वाङ्‍मयात त्यातही विशेषतः विनोदी कथा लेखन व कथाकथनाने स्वतःचे निराळेपण स्थापित करताना मराठवाड्यापासून त्यांची सुरुवात व्हावी याचे आम्हा मंडळींना अप्रुप वाटते. ते ज्याही विचारसरणीचे होते त्या विचारांचा त्यांनी लेखन अभिव्यक्तीवर परिणाम होऊ दिला नाही. वैचारिक भूमिका व ललित लेखन याची संयमाने त्यांनी सीमारेषा अधोरेखित करणारा कलाकार आज गेला हे मराठी सारस्वतांचे नुकसान आहे.

मिरासदारांच्या कथा आपल्या मातीतल्या

(दासू वैद्य) : द. मा. मिरासदारांनी त्यांच्या निधनाने अस्सल मराठी मातीतील इरसाल विनोद हरवला. त्यांच्या कथांमध्ये ग्रामीण जीवन केंद्रस्थानी होते म्हणूनच त्या कथा आपल्या मातीतल्या होत्या. द. मा. मिरासदार, शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर यांनी मराठी कथा सामान्यांपर्यंत पोचविली. त्यामुळे अनेक लोक वाचनाकडे वळाले. चित्रपटांच्या पटकथा लेखनांचे काम त्यांनी यशस्वीपणे केले. त्यांनी सुरवातीला औरंगाबादेत नोकरी केली त्यामुळे त्यांचे औरंगाबादशी वेगळा ऋणानुबंध होता.

loading image
go to top