NND26B03812
----
शाकुंतल स्कूलमध्ये दांडियाचा उत्साह
---
गाण्याच्या तालावर विद्यार्थी, पालक थिरकले
----
सकाळ वृत्तसेवा
नांदेड, ता. १८: शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्स येथे १६ आणि १७ ऑक्टोबर रोजी आयोजित दोन दिवसीय नवरात्रोत्सव दांडिया-गरब्याच्या तालावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपरिक वेशभूषा, रंगांची उधळण आणि संगीताच्या तालावर थिरकणारी पावले यांमुळे शाळेचा परिसर नवरात्रमय झाला होता.
या उत्सवात विद्यार्थी आणि पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. आकर्षक पारंपरिक वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांसह महिला आणि पुरुष पालकांनीही दांडिया-गरब्याचा आनंद लुटला. उत्साह, आनंद आणि सामूहिक सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. शाळेच्या प्रांगणातील आनंदमय वातावरणाने उपस्थितांची मने जिंकली. संस्थेचे अध्यक्ष गिरीश जाधव यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचे जतन करणे, विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक मूल्यांची रुजवण करणे तसेच शाळा आणि पालकांमधील स्नेहबंध दृढ करणे, हा अशा उपक्रमांचा प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष दीपक जाधव, सचिव सिंधूताई जाधव, सहसचिव शिवकुमार बुके, कोषाध्यक्ष पूजा जाधव, प्राचार्य सदाशिव टाकळे, उपप्राचार्य भूना बार्शीकर, विभागप्रमुख श्रीनिवास बिरादार, प्रीती भारती, शिल्पा मेकर आणि रचनाबाला यांची उपस्थिती होती. दोन दिवस चाललेल्या या उत्सवामुळे शाळेत सांस्कृतिक आनंद, उत्साह आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.
-----
बक्षीस वितरणाने वाढविली रंगत
उत्सवात उत्कृष्ट सहभाग नोंदविणाऱ्या आणि आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करणाऱ्या विद्यार्थी व पालकांना विविध प्रकारांत बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासोबतच पालकांनाही शालेय उपक्रमांत सहभागी होण्याची संधी मिळाली. या सोहळ्यास प्रमुख पाहुण्या म्हणून सोनिया राठोड, संगीता ढाणीवाला आणि ज्योती काबरा उपस्थित होत्या.