esakal | आतापर्यंत शेख नासेरने केला तीनशेपेक्षा जास्त मृतांचा दफनविधी

बोलून बातमी शोधा

आतापर्यंत शेख नासेरने केला तीनशेपेक्षा जास्त मृतांचा दफनविधी
आतापर्यंत शेख नासेरने केला तीनशेपेक्षा जास्त मृतांचा दफनविधी
sakal_logo
By
- शेखलाल शेख

औरंगाबाद : मागील वर्षी कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी पुढे येण्यास अनेक जण घाबरत होते. जनजागृती झाल्याने आता कोरोनाने मृत झालेल्यांवर अंत्यसंस्कारासाठी अनेक स्वयंसेवी संस्था, व्यक्ती पुढे येत आहेत. त्यापैकीच एक आहेत शेख नासेर मोहम्मद. त्यांनी मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून तर आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त कोरोना बळींचा दफनविधी केला आहे. त्यांनी दफनविधी केलेल्यांमध्ये औरंगाबाद शहर, औरंगाबाद ग्रामीण, बीड, जालना, परभणी, नांदेड, बुलडाणा, नाशिक येथील मृत झालेल्या कोरोना रुग्णांचा समावेश आहे. महापालिकेच्या बाजूला असलेल्या चितेखाना कब्रस्तानात ते दफनविधीचे कार्य करतात.

३० ते ३५ वर्षांपासून काम

मागील ३० ते ३५ वर्षांपासून शेख नासेर हे चितेखाना कब्रस्तानात दफनविधीचे काम करतात. येथे त्यांच्या मदतीसाठी शेख अन्वर, युसूफ खान हे दोघेजण आहेत. एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास नातेवाईक शेख नासेर यांना संपर्क करतात. त्यानंतर येथे कबर खोदण्यापासून तर अंत्यविधीचे कार्य पार पाडण्याचे काम ते करतात. यासोबत ते जामा मशीद कब्रस्तान येथे सुद्धा अंत्यविधीचे कार्य पार पाडतात. यासोबत जेथून फोन येतो तेथे मदतीसाठीही जातात.

कोरोना रुग्णांचा दफनविधी

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून मराठवाडा, बुलडाणा, नगर, खानदेश येथील गंभीर रुग्ण उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात येतात. यामध्ये सर्वाधिक मराठवाड्यातील रुग्ण असतात. यात कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्यास नातेवाइकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मृत हा मुस्लिम समाजातील असल्यास शक्यतो चितेखाना, जामा मशीद कब्रस्तानात दफनविधी केला जाते. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून तर आतापर्यंत जवळपास ३०० पेक्षा जास्त कोरोना रुग्णांचा दफनविधी शेख नासेर यांनी केला आहे.

दफनविधीसाठी पीपीई किट, सॅनिटायझर आम्हाला महापालिकेकडून मिळते. दफनविधी करताना मोजकेच नातेवाईक येथे असतात. आम्ही दफनविधी केलेले कोरोना रुग्ण मराठवाड्यातील जिल्ह्यातील, ग्रामीण भागातील जास्त प्रमाणात आहेत. तसेच दफनविधीनंतर मृतांचे नातेवाईक त्यांच्या परीने आम्हाला आर्थिक मदत सुद्धा देतात.

- शेख नासेर