शिऊर, सिल्लोड रस्ता बनतोय मृत्यूचा सापळा | Aurangabad | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

accident news.

शिऊर, सिल्लोड रस्ता बनतोय मृत्यूचा सापळा

पिशोर : शिऊर ते सिल्लोड हा राज्य रस्ता रहदारीस सुरुवात झाली आहे. परंतु या रस्त्याच्या कामात असणाऱ्या काही त्रूटी तसेच वाहनांच्या अतिवेगामुळे सिल्लोड ते कन्नड पर्यंत हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून या मार्गातील त्रूटी दूर करण्याची मागणी वाहनधारकांकडून होत आहे.

चार वर्षांपासून या रस्त्याचे काम चालू आहे. अद्याप हस्ता व कन्नड जवळील डोंगर खांडीत हा रस्ता पर्यावरणीय व प्रशासकीय कारणाने तयार होणे बाकी आहे. या व्यतिरिक्त सिल्लोडपासून शिऊरपर्यंत हा मार्ग रहदारीस खुला झालेला आहे. या रस्त्याने भराडी, बोरगाव जवळ, नाचनवेल चौफुली, पिशोर जवळ खडकी पुलानजीक, साखरवेल येथील लोखंडे वस्तीनजीक, कन्नड येथे चौधरी पेट्रोल पंप येथे झालेल्या अपघातात निष्पाप नागरिकांचा बळी गेलेला आहे. हे सर्व अपघात रस्त्याच्या कामातील हलगर्जीपणा व दोषामुळे झालेले असल्याचा आरोप अनेक नागरिकांनी केला आहे.

हेही वाचा: परभणी : लसीकरणात उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल

मार्गावर नाचनवेल चौफुली हे स्थळ अत्यंत धोकादायक व वारंवार अपघात घडणारे ठिकाण झालेले आहे. रविवारी (ता.७) या ठिकाणी दुचाकी व क्रूझरच्या जोरदार धडकेत एका व्यक्तीचा बळी गेला होता. यापूर्वी साखरवेल जवळील पुलाची उंची व रस्ता यांच्या पातळ्यामध्ये समतोल नसल्याने तयार झालेल्या खोलगट भागात वाहने आढळून वाहनचालकाचे नियंत्रण सुटून एका महिलेला चारचाकी वाहनाने उडवले होते. यात महिलेचा जागेवर मृत्यू झाला होता. यानंतर या पुलावर बॅरिकेटस् लावण्यात आले होते.

परंतु कोणतीही सुधारणा अथवा दुरुस्ती केली नव्हती. याच ठिकाणी एक आठवड्यापूर्वी रात्रीच्या वेळी कामावरून परतणाऱ्या पिशोर येथील दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटून या ठिकाणी लावलेल्या या बॅरिकेट्‌सला दुचाकीस्वार मुलगा धडकला होता. हा मुलगा गंभीर जखमी होऊन कोमात गेला होता. नाचनवेल चौफुलीवर सिल्लोड ते कन्नड आणि औरंगाबाद ते पाचोरा या रस्त्यांची क्रॉसिंग असल्याने नेहमी वाहनांची वर्दळ असते. पुनर्बांधणी व नूतनीकरण झालेल्या रस्त्यावर गतिरोधक, रॅम्बलर स्ट्रीप, विविध संकेत दर्शक पाट्या, झाडे व विद्युत खांब आदींचा अडथळा इत्यादींकडे ठेकेदाराने काणाडोळा केलेला असल्याने वारंवार अपघात घडत असल्याच्या तक्रारी होत आहे.

हेही वाचा: येवला : गहू, हरबऱ्यांसह कांद्याचे क्षेत्र वाढणार!

...तर आंदोलनाचा इशारा

- येथील उपसरपंच बाळासाहेब जाधव, भाजप युवा मोर्चा सरचिटणीस गणेश घुगे, एमआयएमचे नासेर पटेल, मुजाहिद अली यांनी जिल्हाधिकारी, बांधकाम विभाग, या रस्त्याचे ठेकेदार यांच्याकडे नाचनवेल चौफुली येथे सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. मागणीची दखल न घेतल्यास नाचनवेल चौफुली येथे गुरुवारी (ता.१८) रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा एमआयएमच्‍या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

loading image
go to top