संजय राऊतांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादेत शिवसेनेचा आक्रोश मोर्चा |Sanjay Raut In Aurangabad | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shiv Sena's Akrosh Morch In Aurangabad
संजय राऊतांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादेत शिवसेनेचा आक्रोश मोर्चा

संजय राऊतांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादेत शिवसेनेचा आक्रोश मोर्चा

औरंगाबाद - स्वयंपाकघरातील तेल, शेंगदाणे, स्वयंपाकाच्या गॅसपासून बॅंकींग व्यवहार, पेट्रोल, डिझेल पर्यंत झालेल्या महागाईला विरोध करण्यासाठ केंद्र सरकारच्या निषेधार्थ शिवसेनेच्यावतीने औरंगाबादमध्ये हजारोंच्या संख्येने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. महागाई विरोधात देशात पहिले आंदोलन शिवसेनेने औरंगाबादमध्ये सुरू केले आहे. महागाई विरोधातील ही पहिली ठिणगी महाराष्ट्रात वणवा पेटवेल असा इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी यावेळी दिला.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. क्रांतीचौक ते गुलमंडी हा मोर्चाचा मार्ग संपुर्ण भगवामय झाला होता. मोदी सरकार, महागाईच्या विरोधातील घोषणांनी मार्ग दणाणून गेला.

महागाईच्या विरोधात औरंगाबाद शिवसेनेच्यावतीने मागील चार दिवसांपासून वातावरण निर्मिती केली गेली. २०१४ मधील आणि सध्याचे वस्तूंचे तुलनात्मक दरांचे फलक करून जिल्हाभरात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाचा गॅस प्रचंड महागल्याने पेट्रोल पंप, गॅस एजन्सीवर दरोडे पडू शकतात यासाठी त्यांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी करणारे उपरोधिक आंदोलन शिवसेना महिला आघाडीच्यावतीने करून मोर्चासाठीची वातावरण निर्मिती करण्यात आली होती त्याचा परिणाम शनिवारी (ता.१३) निघालेल्या मोर्चात जाणवला. क्रांतीचौकात शहरी भागासह ग्रामीण भागातुन हजारोंच्या संख्येने भगवे झेंडे, गळ्यात भगवे उपरणे टाकलेल्या शिवसैनिकांचे जत्थे आले होते. गुलमंडीपर्यंत रस्त्याने भगवे झेंडे आणि भगवी पताका लावुन वातावरण भगवेमय करण्यात आले होते.

क्रांतीचौकात व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून मोर्चाची सुरूवात झाली व गुलमंडी येथे मोर्चाची जाहीर सभेने सांगता झाली. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात निघालेल्या या आक्रोश मोर्चात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, उपनेते लक्ष्मणराव वडले, संपर्कनेते विनोद घोसाळकर, मोर्चाचे संयोजक शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे, महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, उदयसिंग राजपुत, रमेश बोरनारे, माजी आमदार किशनचंद तनवाणी, युवासेनेचे विस्तारक मंदार चव्हाण, युवासेना उपसचिव राजेंद्र जंजाळ, माजी महापौर नंदकुमार घोडेले, महिला आघाडीच्या सुनिता आऊलवार, कला ओझा, सुनिता देव, प्रतिभा जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा: भाजप आमदार कुचेंची जीभ घसरली;म्हणाले, राज्य सरकार पाकिस्तानची औलाद

क्या हुवा तेरा वादा.......

इंधन महागल्याने पेट्रोल, डिझेल वापरणे परवडत नाही दर्शवण्यासाठी माजी नगरसेवक बन्सी गांगवे सायकलीचा हातागाडा करून त्यावर दुचाकी ठेऊन सायकलीने मोर्चात सहभागी झाले होते. तर बाबासाहेब डांगे स्वयंपाकाचा गॅस ९१० रूपये झाल्याचे व त्यावर ‘ क्या हुवा तेरा वादा .....' असा उल्लेख करून गॅसचे दर कमी करण्याच्या आश्वासनाचे काय झाले असा केंद्र सरकारल जाब विचारण्यासाठी चक्क गॅस सिलेंडर घेऊन आले होते.

तगडा पोलिस बंदोबस्त

मोर्चा शिस्तीत ठेवा, योग्य घोषणा द्या अशा मोर्चेकऱ्यांना आयोजकाकडून अधीच सूचना दिल्याने जनसामान्यांचा आक्रोश मोर्चा शांततेत व शिस्तीत निघाला. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मछलीखडकला प्रतिमोर्चा काढण्याचा आधीच इशारा दिला होता त्यामुळे शिवसेनेच्या आक्रोश मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त होता. स्वत: पोलिस आयुक्त क्रांतीचौकापासून गुलमंडी पर्यंत मोर्चावर लक्ष ठेऊन असल्याचे दिसले.

loading image
go to top