Aurnagabad : लेबर कॉलनीत वाजला सायरन! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ambulance

लेबर कॉलनीत वाजला सायरन!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : विश्‍वासनगर लेबर कॉलनी येथील जीर्ण झालेली शासकीय निवासस्थाने कोणत्याही क्षणी पाडण्यास सुरूवात होईल, या भीतीने लेबर कॉलनीतील रहिवाशांची आधीच झोप उडाली आहे. त्यात भर म्हणून सोमवारी (ता.१५) सकाळीच सायरन वाजवतच ॲम्बुलन्स आली आणि नागरीकांची पाचावर धारण बसली. मात्र, पाडापाडीची कारवाई लांबणीवर पडल्याचे समजल्यानंतर ॲम्बुलन्स परतल्या आणि नागरिकांनी सुस्कारा सोडला.

लेबर काॅलनी येथील निवासस्थाने पाडण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत. निवासस्थाने पाडू नये म्हणून येथील नागरिकांनी लोकशाही मार्गाने आंदोलन केले होते. तथापि, लेबर कॉलनी भागातील जीर्ण झालेली शासकीय निवासस्थाने रिकामे करण्यासाठी प्रशासनाकडून पुर्ण तयारी केली आहे. यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली आहेत. मात्र त्रिपुरा, अमरावतीतील हिंसाचार आणि राज्यातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे प्रशासनाने मोहीम लांबणीवर टाकली. तर दुसरीकडे कारवाईला सोमवारी सकाळी सुरुवात होणार असल्याने सकाळी साडेआठ वाजता त्या ठिकाणी पोचावे हा मॅसेज १०८ रुग्णवाहिकेच्या जिल्हा व्यवस्थापकाला मिळाला होता. परंतु कारवाई लांबणीवर टाकल्याचा मॅसेज त्यांच्यापर्यंत पोहोचला नसावा.

त्यामुळे सोमवारी सकाळीच काही अम्ब्युलन्स लेबर कॉलनी भागात दाखल झाल्या. त्यामुळे कारवाईला सुरुवात झाली की काय, अशी भीती येथील नागरिकांत पसरली. अम्ब्युलन्स दाखल झाल्याची माहिती सर्वत्र पसरल्याने नागरिकांची झोप उडाली. या भागात नागरिक गोळा झाले. त्यानंतर ॲम्ब्युलन्स चालक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना मोहीम लांबणीवर टाकल्याची माहिती मिळाली. त्यामुळे ते लेबर कॉलनी भागातून निघून गेले. हे पाहून लेबर काॅलनीतील नागरिकांनीही सुटकेचा श्वास सोडला.

चंद्रकांत खैरे यांनी घेतली प्रशासन प्रमुखांची भेट

शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी रविवारी (ता. १४) नागरिकांची भेट घेऊन घुसखोरांना बाहेर काढा, मूळ रहिवाशांसाठी पाठपुरावा करू, अशी भूमिका घेतली होती. रहिवाशांना न्याय मिळवून देण्यासाठी पालकमंत्री, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार सोमवारी श्री. खैरे व आमदार संजय शिरसाट यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा केली. हकदार आणि घुसखोरांची यादी करून हकदारांना पर्यायी जागा देण्याची मागणी केल्याचे श्री. खैरे यांनी सांगितले.

loading image
go to top