स्कोडा-वोक्सवॅगन-जेएसडब्ल्यू
भागीदारीने संभाजीनगरला संधी
-
इलेक्ट्रिक, हायब्रिडसह प्रवासी वाहन निर्मितीचा मार्ग मोकळा
-
छत्रपती संभाजीनगर ः भारतातील प्रवासी वाहन उद्योगात मोठी घडामोड घडली असून, स्कोडा ऑटो, वोक्सवॅगन आणि जेएसडब्ल्यू ग्रीन मोबिलिटी लिमिटेड यांनी भारतात संयुक्त उपक्रम उभारण्याच्या दिशेने सामंजस्य करार (एमओयू) केला आहे.
या भागीदारीतून भारतासह परदेशी बाजारपेठांसाठी प्रवासी वाहनांची निर्मिती, विकास आणि विक्री करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे जेएसडब्ल्यूच्या छत्रपती संभाजीनगरमधील वाहन उत्पादन केंद्रालाही भविष्यात मोठी संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रस्तावित भागीदारीत पारंपरिक पेट्रोल-डिझेल वाहनांसह इलेक्ट्रिक, प्लग-इन हायब्रिड आणि हायब्रिड वाहनांच्या निर्मितीवर भर दिला जाणार आहे. स्कोडाची अभियांत्रिकी, वाहन विकास आणि तंत्रज्ञानातील क्षमता, तर जेएसडब्ल्यू समूहाची उत्पादन क्षमता, औद्योगिक पायाभूत सुविधा आणि भारतातील अंमलबजावणीचा अनुभव यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
-----------------
चौकट
-
स्थानिकीकरणाला चालना
-
वाहनांचे स्थानिकीकरण वाढविणे, उत्पादनाचा विस्तार करणे, संशोधन व विकास क्षमता मजबूत करणे आणि भारतीय बाजारपेठेसाठी स्पर्धात्मक वाहने विकसित करणे हा या भागीदारीचा प्रमुख उद्देश आहे. उच्च स्थानिकीकरणामुळे उत्पादन खर्च कमी होण्याबरोबरच देशांतर्गत पुरवठादार साखळीला चालना मिळण्याची शक्यता आहे.
-----
चौकट
-----
संभाजीनगरकडे लक्ष
----------------
जेएसडब्ल्यूच्या छत्रपती संभाजीनगर येथील उत्पादन सुविधेचा भविष्यात या भागीदारीसाठी अधिक व्यापक वापर करण्याची शक्यता आहे. स्कोडा कोडियाकसारख्या वाहनांचे अधिक स्थानिकीकरण तसेच पुढील पिढीतील कोडियाकच्या प्लॅटफॉर्मचे भारतात उत्पादन करण्याच्या शक्यतेचा विचार सुरू आहे. मात्र, याबाबत अद्याप अंतिम निर्णय किंवा अधिकृत मंजुरी झालेली नाही, अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
भागीदारीची अंतिम मालकी रचना, गुंतवणूक आणि उत्पादनाचे ठिकाण याबाबतचा तपशील पुढील वाटाघाटीनंतर निश्चित होणार आहे. योजना प्रत्यक्षात आल्यास छत्रपती संभाजीनगरला प्रगत प्रवासी वाहन, इलेक्ट्रिक वाहन आणि निर्यात उत्पादनाच्या नकाशावर महत्त्वाचे स्थान मिळू शकते.