लघू बचत योजनांच्या व्याजदरात बदल नाही
-----
पीपीएफ ७.१ टक्के, सुकन्या समृद्धीला ८.२ टक्के; १ ऑक्टोबरपासून नवे दर लागू
---
सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर, ता. ३ ः केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या तिसऱ्या तिमाहीसाठी लघू बचत योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत जुलै ते सप्टेंबर तिमाहीतीलच व्याजदर कायम राहणार आहेत. त्यामुळे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफवर ७.१ टक्के, तर सुकन्या समृद्धी योजनेवर ८.२ टक्के व्याज मिळणार आहे.
वित्त मंत्रालयाने बुधवारी (ता. ३०) याबाबत घोषणा केली. लघू बचत योजनांच्या व्याजदरांचा सरकारकडून दर तीन महिन्यांनी आढावा घेतला जातो. मात्र, चालू तिमाहीसाठी कोणत्याही योजनेच्या दरात बदल करण्यात आलेला नाही. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर ७.७ टक्के, किसान विकास पत्रावर ७.५ टक्के, ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर ८.२ टक्के आणि मासिक उत्पन्न योजनेवर ७.४ टक्के व्याजदर कायम राहणार आहे. पोस्ट ऑफिस बचत खात्यावर चार टक्के व्याज मिळेल. एक वर्षाच्या मुदत ठेवीवर ६.९ टक्के, दोन वर्षांसाठी ७ टक्के, तीन वर्षांसाठी ७.१ टक्के आणि पाच वर्षांच्या मुदत ठेवीवर ७.५ टक्के व्याजदर कायम ठेवण्यात आला आहे. पाच वर्षांच्या आवर्त ठेवीवर ६.७ टक्के व्याज मिळणार आहे.
---
योजना ः व्याजदर
सुकन्या समृद्धी योजना ः ८.२० टक्के
पीपीएफ ः ७.१० टक्के
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ः ७.७० टक्के
किसान विकासपत्र ः ७.५० टक्के
ज्येष्ठ नागरिक बचत योजना ः ८.२० टक्के
मासिक उत्पन्न योजना ः ७.४० टक्के
पोस्ट ऑफिस बचत खाते ः ४.०० टक्के
एक वर्षांची मुदत ठेव ः ६.९० टक्के
दोन वर्षांची मुदत ठेव ः ७.०० टक्के
तीन वर्षांची मुदत ठेव ः ७.१० टक्के
पाच वर्षांची मुदत ठेव ः ७.५० टक्के
पाच वर्षांची आवर्त ठेव ः ६.७० टक्के