एसटीचा पास आता एका क्लिकवर
----
‘आवडेल तेथे प्रवास’ योजना ऑनलाइन; चार आणि सात दिवसांचे पास मिळणार घरबसल्या
---
जळकोट, ता. १४ (बातमीदार) : दिवाळीच्या सुट्यांनिमित्त एसटी महामंडळातर्फे ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ पास योजना आता ऑनलाइन करण्यात आली आहे. त्यामुळे चार आणि सात दिवसांचे पास घरबसल्या मोबाइलवरून काढता येणार असून, हस्तलिखित पाससाठी आगार किंवा बसस्थानकाच्या तिकीट खिडकीवर रांगेत उभे राहण्याची कटकट संपणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाहतूक विभागाने २९ सप्टेंबरला जारी केलेल्या परिपत्रकानुसार ही ऑनलाइन कार्यप्रणाली सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी या योजनेचा पास मिळविण्यासाठी प्रवाशांना संबंधित एसटी आगारात जावे लागत होते. गर्दीच्या वेळी रांगेत थांबावे लागत असल्याने वेळ आणि श्रम खर्च होत होते. तसेच कागदी पास हरवण्याची किंवा खराब होण्याची शक्यताही होती. आता डिजिटल सुविधेमुळे प्रवाशांची ही गैरसोय दूर होणार आहे. या योजनेअंतर्गत ठरावीक शुल्क भरून चार किंवा सात दिवसांचा पास घेता येतो. या पासच्या माध्यमातून साधी, जलद, रात्रसेवा, शहर बस तसेच शिवशाही, ई-शिवाई (१२ मीटर) आणि आंतरराज्य बससेवांमधून नियमानुसार प्रवास करता येतो. सुट्यांमध्ये पर्यटन, देवदर्शन तसेच नातेवाइकांकडे जाण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरते. आता ऑनलाइन पासमुळे प्रवासाचे नियोजन अधिक सोपे होणार आहे. या ऑनलाइन पासवर विशिष्ट क्यूआर कोड देण्यात येणार आहे. प्रवासादरम्यान एसटी वाहकाच्या ईटीआयएम मशीनद्वारे हा कोड स्कॅन करून पासची माहिती तपासली जाईल. त्यातून प्रवाशाचे नाव, पासचा प्रकार आणि वैधता कालावधी यांची पडताळणी करता येईल. आवश्यक ओळखपत्र तपासल्यानंतर प्रवासाची परवानगी दिली जाईल. या डिजिटल पडताळणीमुळे पास व्यवस्थापनात पारदर्शकता वाढण्यासह बनावट पासच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे.
----
अधिकृत संकेतस्थळावरून करता येणार नोंदणी
--------
प्रवाशांना एसटी महामंडळाच्या msrtc.maharashtra.gov. in या अधिकृत संकेतस्थळावर किंवा महामंडळाच्या मोबाइल ॲपवरून पाससाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी नाव, वय, ओळखपत्र, पासचा प्रकार आणि बसचा प्रकार यांसारखी आवश्यक माहिती भरावी लागेल. त्यानंतर यूपीआय किंवा कार्डद्वारे शुल्क भरता येईल. पेमेंट पूर्ण झाल्यानंतर पास ई-मेलवर उपलब्ध होईल. त्याची प्रिंट काढून सोबत ठेवता येईल किंवा मोबाइलमध्ये पीडीएफ स्वरूपात दाखविता येईल
---
((कोट))
‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेत चार आणि सात दिवसांचे पास मिळणार ऑनलाइन मिळणार आहेत. या साध्या बससाठी सात दिवसांचे पास दोन हजार ७७५ रुपयांना, तर शिवशाहीला सात दिवसांच्या पासला तीन हजार ६५० रुपये मोजावे लागणार आहेत.
- एस.आर. पेठे, वाहतूक नियंत्रक, जळकोट