esakal | हे राम : पारंपरिक विधिनाट्य 
sakal

बोलून बातमी शोधा

photo

५९ वी राज्य नाट्यस्पर्धा : अंतिम फेरी 

हे राम : पारंपरिक विधिनाट्य 

sakal_logo
By
सुधीर सेवेकर

औरंगाबाद : उत्तर महाराष्ट्राच्या ठाणे- नाशिक जिल्ह्याच्या वाडा-मोखाडा, चांदवड पेठ, सुरगणा या भागांत लोकप्रिय असलेल्या बोहडा किंवा सोंगे नाचविणे या पारंपरिक विधिनाट्य परंपरेतले हे नाटक आहे. याचा संबंध गांधीजी वा अयोध्या वा मानवी मरणाशी नाही. तसा गैरसमज होऊ शकतो, म्हणून हा आरंभीच खुलासा. 

हे ही वाचा -   भाजपचे नगरसेवक आले काळे कपडे घालून आणि...   

विलक्षण लवचिकता 

रंगमंचीय परिभाषेत ज्याला रफ थिएटर म्हणजे ओबडधोबड वा रांगडे थिएटर म्हणतात, त्या प्रकाराचे हे नाटक आहे. अशा प्रकारात रंगमंच आणि प्रेक्षक यांना विभागणारा मुख्य पडदा नसतो. तसेच नाटक केवळ रंगमंचावरच घडते असे नव्हे तर ते नाट्यगृहात, प्रेक्षकांमध्येही घडते. विलक्षण लवचिकता, जिवंतपणा आणि रांगडेपणा असणारे हे सादरीकरण असते. ते केले मुंबई विद्यापीठाच्या अॅकॅडमी ऑफ थिएटर आर्टस्‌ या नाट्यशास्त्र विभागाने. त्याचे प्रमुख व लोकरंगभूमीचे अभ्यासक प्रा. गणेश चंदनशिवे हे स्वतः या नाट्यचमूसोबत आले होते. काहीप्रसंगी त्यांनी पार्श्‍वगायनही केले. 

सोंगे नाचविण्याची गोष्ट 

तर रामजन्मोत्सवानिमित्त बोहडा अर्थात सोंगे नाचविण्याची परंपरा असलेल्या एका गावची ही गोष्ट आहे. सामाजिक सलोखा टिकावा म्हणून शे-सव्वाशे वर्षांपूर्वी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी एका मातंग कुटुंबाला श्रीरामाचे पार्ट करण्याची परंपरा सुरू केलेली असते. ती चार पाच पिढ्यांपासून गुण्या गोविंदाने चालू असते; पण आता जमाना बदललाय. जत्रेत सोंगे नाचविणारे लोक आता म्हातारे झालेत. नव्या पिढीस त्यात रुची नाही. द्राक्ष निर्यात वगैरेमुळे सधन झालेल्या नव्या पिढीची जीवनदृष्टीही वेगळी आहे. 

हेही वाचा- तुम्ही एलआयसी पॉलिसी काढली असेल, तर आधी हे वाचा  

वेगळाच परिणाम 

मुख्य म्हणजे त्या मातंग कुटुंबानेच श्रीरामाचे पार्ट का करायचे? आता त्यात बदल हवा. नाहीतर हा खेळच बंद करा. एवढा तणाव वाढतो; पण माहिती येते की यंदा डिस्कव्हरी चॅनेलवाले या बोहडा नाट्याचे चित्रीकरण करायला येणार आहेत आणि गावात त्याने एकच चैतन्य उसळते. शेवटी त्या मातंग तरुणाने यंदा राक्षसाचा पार्ट करायचा अशी तडजोड होते आणि एकेक सोंग पदन्यास करीत नाचत मंचावर येत जाते. कलावंतांमधील एनर्जी, संगीताचा वाढता व्हॉल्युम इत्यादी सगळं टिपेला पोचते. पुढे काय होतं? त्यासाठी हे नाटकच पाहायला हवं. आरंभी विलक्षण विस्कळित, बेशिस्त आणि धुडगूससदृश वाटणारं हे रांगडं सादरीकरण नंतर मात्र एक वेगळाच परिणाम साधून जातं. यंदाच्या महोत्सवातील एक महत्त्वाचं नाटक म्हणजे हे राम हे नक्की. 

लेखक : दिग्दर्शक : राम दौंड. नेपथ्य : अरुण कदम. संगीत : आशुतोष वाघमारे. प्रकाश योजना : विनोद राठोड. रंगभूषा : संकेत बोंद्रे. वेशभूषा : मोनिका बनकर. कलावंत : विशाल सोनवणे, मुक्ता वळसे, दर्शन दामोधर, पावन इंद्रेकर, प्रसाद खडके, मंजू गंगावणे, अरुंधती कामठे, प्रथमेश दिग्रसकर, काजल कोकाटे, आदित्य धलवार, संतोष पैठणे, सायली जोशी, मृणाल शेळके आदी चाळीस कलावंत. सादरकर्ते : अॅकॅडमी ऑफ थिएटर आर्टस्‌, मुंबई विद्यापीठ. 


 

 
 

loading image