

Educational Guardianship:
Sakal
आशा जाधव (नाव बदलले आहे) यांना एकापाठोपाठ दोन मुली झाल्याने पतीने साथ सोडली अन् त्यांच्या आयुष्यात वादळ आलं. पदरात दोन चिमुकल्या मुली असताना एकाकी पडलेल्या आशा यांनी हार मानली नाही. त्यांनी जवळच्या सोसायट्यांमध्ये जेवण बनविण्याचे काम मिळविले. आता याच जोरावर त्या दोन्ही मुलींना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी धडपडत आहेत. आशा यांच्याप्रमाणे राज्यात लाखो महिला एकल माता आहेत.
पोटच्या लेकरांसाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या अशा एकल मातांच्या मुला-मुलींची माहिती संकलित करण्याचे काम शिक्षण विभागाने हाती घेतले आहे. संकलित होणाऱ्या माहितीतून एकल मातांच्या पाल्यांच्या ‘शैक्षणिक पालकत्वा’ची जबाबदारी घेण्याच्या दिशेने राज्य सरकारचे पाऊल लवकरच पडण्याची चिन्हे आहेत.