बलभीम महाविद्यालयात
राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन
सकाळ वृत्तसेवा
बीड, ता. ३१ : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी आणि त्यांच्या संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या बलभीम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात १ सप्टेंबर २०२६ रोजी १७ व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. संस्थेचे संस्थापक कै. विनायकराव पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो.
या प्रदर्शनाचे उद्घाटन म.शि.प्र. मंडळाचे उपाध्यक्ष तथा माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हस्ते, तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष उंदरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. बक्षीस वितरण सोहळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रो. डॉ. भास्कर साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडेल. या प्रदर्शनात राज्यभरातील पदवी व पदव्युत्तर स्तरावरील शेकडो विद्यार्थी आपले नाविन्यपूर्ण ‘सायन्स मॉडेल्स’ आणि ‘पोस्टर्स’ सादर करतील.
प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी विज्ञान मंचाचे समन्वयक डॉ. आर. आर. भोसले, १७ व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे समन्वयक डॉ. बी. टी. ताटे, संयोजक डॉ. एस. एस. भोसले आणि आयक्यूएसी समन्वयक डॉ. ए. डी. चिंधे परिश्रम घेत आहेत.
-----
नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश
शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, यासाठी शहरातील इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन दुपारी १२ ते ३ या वेळेत मोफत खुले राहील. सर्व माध्यमिक विद्यालयांनी आपल्या विद्यार्थ्यांना या वैज्ञानिक सफरीसाठी पाठवावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. संतोष उंदरे, उपप्राचार्य डॉ. बाबासाहेब कोकाटे व संयोजन समितीने केले आहे.