अमेरिकेतील फायबर विस्तारासाठी ‘एसटीएल’ची कायनेटिकसोबत भागीदारी
‘कायनेटिक क्विक कनेक्ट’ तंत्रज्ञानाचा १८ राज्यांत वापर
नेटवर्क उभारणीचा वेळ, खर्च कमी करण्यावर भर
छत्रपती संभाजीनगर, ता. २२ : स्टरलाइट टेक्नॉलॉजीज् लिमिटेडच्या (एसटीएल) अमेरिकी उपकंपनी एसटीएल ऑप्टिकल कनेक्टिव्हिटी एनएने अमेरिकेतील फायबर इंटरनेट सेवा पुरवठादार कायनेटिकसोबत भागीदारी केली आहे. याअंतर्गत अमेरिकेतील १८ राज्यांत फायबर नेटवर्क विस्तारासाठी एसटीएलच्या ‘कॉनकॅट’ तंत्रज्ञानाचा वापर ‘कायनेटिक क्विक कनेक्ट’ या नावाने केला जाणार आहे.
एसटीएल ही जागतिक ऑप्टिकल आणि डिजिटल नेटवर्किंग कंपनी असून, ५जी दूरसंचार नेटवर्क, ग्रामीण ब्रॉडबँड, एफटीटीएक्स, उद्योगांसाठीची जोडणी आणि डेटा सेंटर नेटवर्कसाठी तंत्रज्ञान पुरवते. पूर्वजोडणी केलेल्या या प्रणालीत केबल असेंब्ली, संरक्षक आवरण आणि कॅसेट यांचा एकत्रित समावेश आहे. त्यामुळे खांबांवरील आणि भूमिगत फायबर नेटवर्कची उभारणी सुलभ होऊन वेळ आणि खर्च कमी करण्यासह स्थापनेचा दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे.
अमेरिकेतील उत्तर कॅरोलिना राज्यात या तंत्रज्ञानाच्या चाचण्या घेण्यात आल्या. प्रत्यक्ष कामातील अडचणींचा अभ्यास करून जोडणी प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली. एसटीएलचे तंत्रज्ञान आणि उत्पादनक्षमता, तसेच कायनेटिकचा नेटवर्क उभारणीचा अनुभव यांच्या एकत्रित वापरातून ग्राहकांना जलद इंटरनेट जोडणी देण्याचे उद्दिष्ट आहे. एसटीएलच्या ऑप्टिकल नेटवर्किंग व्यवसायाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल पुरी आणि कायनेटिकचे मुख्य नेटवर्क अधिकारी मॅनी सॅम्पेड्रो यांनी या सहकार्यामुळे नेटवर्क विस्तार अधिक वेगाने करणे, खर्च कमी करणे आणि ग्राहकांचा अनुभव सुधारणे शक्य होईल, असे म्हटले आहे.
----
३ हजार कोटी रुपयांची योजना
स्टरलाइटने विद्यमान उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी ३ हजार कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाची योजना जाहीर केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने मंजूर केलेल्या या प्रस्तावित विस्तारामुळे, आर्थिक वर्ष २०२९ च्या अखेरीस एसटीएलच्या स्थापित उत्पादन क्षमतेत अंदाजे ५० टक्क्यांनी वाढ होण्याची अपेक्षा आहे. ऑप्टिकल फायबर केबल्स आणि कनेक्टिव्हिटी सोल्यूशन्सच्या जागतिक मागणीतील अपेक्षित वाढ पूर्ण करणे, तसेच कंपनीची उत्पादन क्षमता मजबूत करणे, हे या विस्ताराचे उद्दिष्ट असून एसटीएल सध्या सुमारे ७० टक्के क्षमतेने कार्यरत आहे.