पेन्शन साडेसात हजार रुपये द्या !
राष्ट्रीय संघर्ष समितीची मागणी
छत्रपती संभाजीनगर, ता. ५ ः खासगी क्षेत्रात आयुष्यभर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळणारी अत्यल्प पेन्शन आणि महागाईच्या काळात होणारी परवड लक्षात घेता, ईपीएस-९५ राष्ट्रीय संघर्ष समितीतर्फे किमान ७,५०० रुपये व महागाई भत्ता देण्यात यावा, या मागणीसाठी संघर्ष केला जात आहे.
खासगी क्षेत्रात २० ते ३० वर्षे नोकरी केल्यानंतर कर्मचाऱ्यांना केवळ एक ते तीन हजार रुपये पेन्शन मिळते, जी या वाढत्या महागाईत कुटुंब चालवण्यासाठी अत्यंत अपुरी आहे. त्यामुळे किमान साडेसात हजार रुपय पेन्शन मिळावी व महागाई भत्ता देण्यात यावा, यासाठी संघर्ष समिती काम करत आहे. पेन्शनधारकच नव्हे, तर कार्यरत कर्मचाऱ्यांनाही या संघर्षात सामावून घेण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. त्यानुसार आज आम्ही पेन्शनर आहोत, उद्या तुम्ही पेन्शनर होणार आहात, हा विचार करून कार्यरत कर्मचाऱ्यांनीही या लढ्यात सहभागी व्हावेस, असे आवाहन समितीने केले आहे. पेन्शनर पती-पत्नीला मोफत वैद्यकीय सुविधा मिळावी. योजनेत समाविष्ट नसलेल्यांना योजनेत सामावून घेऊन प्रतिमहिना ५००० रुपये पेन्शन देण्यात यावी. आदी मागण्या संघटनेतर्फे करण्यात आल्या असून, राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखाली २०१८ मध्ये या राष्ट्रीय संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. माहितीसाठी कार्याध्यक्ष कमलाकर पांगारकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
----