फोटोसह ABD26J81021
जवळा पांचाळ (ता.कळमनुरी)ः पावसाअभावी उसाची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी पीक वाळत आहे.(छायाचित्र ः अविनाश उदगीरे)
----------------
वाढत्या तापमानामुळे उसाची खुंटली वाढ
-------------
उत्पादनात घट होण्याची शक्यता; जवळा पांचाळ येथे शेतकरी संकटात
जवळा पांचाळ, ता.१०(बातमीदार)ः परिसरात पावसाने दडी मारल्याने आणि वाढत्या तापमानाचा फटका बसल्याने ऊस उत्पादक अडचणीत सापडले आहेत. पाण्याअभावी हिरवीगार शेतं आता सुकू लागली असून अनेक ठिकाणी पिकाची अवस्था पालापाचोळ्यासारखी झाली आहे. त्यामुळे यंदा उसाचे अपेक्षित उत्पादन मिळणार की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
वास्तविक ऊस हे दीर्घ कालावधीचे पीक असल्याने त्याला नियमित पाणीपुरवठा आवश्यक असतो. मात्र, परिसरात पुरेसा पाऊस न झाल्याने पाण्याची उपलब्धता कमी झाली आहे. त्यातच वाढत्या तापमानामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत असून उसाच्या वाढीवर विपरीत परिणाम होत आहे. अनेक शेतांत वाढ खुंटली असून पाने वाळू लागली आहेत. परिणामी, उसाची जाडी, उंची अपेक्षेप्रमाणे वाढत नसल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. ऊस लागवडीसाठी शेतकऱ्यांनी मशागत, खते, औषधे, मजुरी आणि पाण्यासाठी मोठा खर्च केला आहे. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकाची अवस्था बिकट झाल्याने केलेला खर्च वसूल होणार की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. पिकाला वेळेवर पाणी मिळाले नाही, तर उसाच्या वजनावर, गुणवत्तेवर परिणाम होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची भीती आहे. एकीकडे वाढता उत्पादन खर्च, तर दुसरीकडे पावसाची कमतरता, वाढते तापमान अशा दुहेरी संकटात ऊस उत्पादक सापडले आहेत.
-----------------
((कोट))
ऊसासाठी आतापर्यंत मोठा खर्च केला आहे. मात्र, पाऊस नसल्याने जमिनीतील ओलावा कमी झाल्याने वाढ थांबली आहे. पानं वाळत आहे. अशा परिस्थितीत शेतीचा खर्च कसा भरून काढायचा, हा मोठा प्रश्न आहे.
-कामाजी जाधव, जवळा पांचाळ
-----------
((कोट)))
वाढत्या तापमानाचा उसाला मोठा फटका बसत आहे. पुरेसे पाणी मिळत नसल्याने ऊस सुकत आहे. चांगली वाढ होईल आणि चांगले उत्पादन मिळेल, या अपेक्षेने लागवड केली होती. मात्र आता चिंता वाटत आहे.
-हर्षल भुरेवार, जवळा पांचाळ
-----
((कोट)))
ऊसासाठी खत, औषधे, मजुरीवर मोठा खर्च करावा लागतो. पाऊस कमी झाल्याने आणि उन्हाची तीव्रता वाढल्याने अवस्था खराब झाली आहे. उत्पादन घटले, तर केलेला खर्चही निघणे कठीण होईल. त्यामुळे शासनाने मदत करावी.
निसार पठाण, जवळा पांचाळ.
---------------------