जवान होण्याचं स्वप्न राहिलं अधुरं! भरतीची तयारी करणाऱ्या युवकाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Army Recruitment Aurangabad Crime News

योगेश हा गेल्या दोन वर्षांपासून सैन्य दलाची तयारी करत होता.

जवान होण्याचं स्वप्न राहिलं अधुरं! भरतीची तयारी करणाऱ्या युवकाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

औरंगाबाद : सैन्य दलाच्या भरतीची (Indian Army Recruitment) तयारी करणाऱ्या एका युवकानं विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात उघडकीस आलीय. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. हा युवक दररोज पहाटे सैन्य भरतीच्या सरावासाठी जात होता, त्याचप्रमाणं आजही तो गेला होता. मात्र, त्याचा शेतातील विहिरीत मृतदेह आढळल्यानं खळबळ उडालीय. पैठण तालुक्यातील (Paithan Taluka) पाचोड खुर्द येथील सैन्य दलाच्या भरतीची तयारी करणाऱ्या युवकानं सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. योगेश लक्ष्मण वाघ असं मृत युवकाचं नाव आहे.

हेही वाचा: VIDEO : क्रिकेटच्या देवाचा असाही साधेपणा! सचिन तेंडुलकरनं रस्त्यात थांबून टपरीवर घेतला चहाचा 'आस्वाद'

योगेश हा गेल्या दोन वर्षांपासून सैन्य दलाची तयारी करत होता. त्यामुळं तो दररोज पहाटेच्या दरम्यान आपल्या शेताकडं जाऊन तयारी करत असे. आज सकाळी तो गेला होता. मात्र, 8 वाजले तरीही तो घरी परतला नाही. त्यामुळं घरातील नातेवाईक शेताकडं गेले असता, त्यांना योगेशनं घरुनसोबत नेलेली दुचाकी शेतात लावलेली दिसली. परंतु, तो तिथ दिसला नसल्यामुळं नातेवाईकांना संशय आला. त्यांनी शेजारच्या विहिरीकडं जाऊन पाहिलं असता, विहिरीमध्ये योगेशची चप्पल तरंगत असल्याचं दिसली. त्यांनी या घटनेची माहिती तात्काळ गावकरी, नागरिकांना दिली असता गावकऱ्यांनी त्या विहिरीत लोखंडी गळ सोडून त्याचा विहिरीत शोध घेतला. तेव्हा योगेशचा मृतदेह आढळून आला. त्यानं आत्महत्या का केली? हे अद्यापही समजू शकलेलं नाहीय. याबाबतचा अधिक तपास पोलिस करत आहेत.